नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठातील ‘ऑनलाईन’ परीक्षेत अपप्रकारांचे धडे !

  • ध्वनीचित्र-चकत्यांचा सामाजिक माध्यमांवर सुळसुळाट

  • अपप्रकार रोखण्याच्या संदर्भात विद्यापिठाकडे धोरण नाही !

नागपूर – येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाची हिवाळी परीक्षा अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच उन्हाळी परीक्षा २९ जूनपासून चालू होत असून कोरोनामुळे ‘ऑनलाईन’ पद्धतीने परीक्षा होणार आहे. विद्यापिठाने ‘ऑनलाईन’ परीक्षा पूर्णपणे पारदर्शी पद्धतीने होत असल्याचा दावा केला आहे; मात्र ‘यू ट्यूब आणि इतर सामाजिक माध्यमे’ यांच्यावर ‘ऑनलाईन’ परीक्षेत अपप्रकार कसे करायचे ?’ याचे धडे देणार्‍या अनेक ध्वनीचित्रचकत्या आहेत. नागपूर विद्यापिठाने अद्याप अशा प्रकारच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी कोणतीही कार्यवाही किंवा धोरण सिद्ध केलेले नाही. (‘ऑनलाईन’ परीक्षा घेतांना ती पारदर्शकपणे कशी होईल, यासाठी शिक्षण विभागाच्या साहाय्याने अशा ध्वनीचित्रचकत्या सिद्ध करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडले पाहिजे ! – संपादक)

१. विद्यापिठाची १ घंट्याची ‘ऑनलाईन’ परीक्षा असते. विद्यार्थ्यांना घरी बसून ही परीक्षा द्यावी लागते. विद्यापिठाने यासाठी ‘वेब’ आधारित संकेतस्थळ सिद्ध केले आहे. त्यामध्ये अपप्रकार रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत.

२. विद्यार्थ्यांना परीक्षेचे संकेतस्थळ चालू असतांना भ्रमणभाषचे ‘लोकेशन’ चालू ठेवावे लागेल. यामुळे विद्यार्थी एकाच ठिकाणावरून परीक्षा देत असेल, तर अपप्रकार होण्याची शक्यता अल्प असल्याचा दावा केला जातो.

३. ‘लॉग इन’साठी विद्यार्थ्यांना भ्रमणभाषचा कॅमेरा आणि ‘माईक’ चालू ठेवावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाते.

४. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालींची नोंद केली जात असल्याचा दावाही विद्यापिठाने केला आहे; मात्र सामाजिक माध्यमांवर परीक्षेत अपप्रकार कसे करावेत ? याचे धडे देणार्‍या ध्वनीचित्र चकत्यांचे कुणी अनुकरण केले, तर त्यावर आळा घालणारी कुठलीही यंत्रणा मात्र विद्यापिठाकडे नाही.

५. परीक्षा आणि मूल्यांकन विभागाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे म्हणाले, ‘‘परीक्षांच्या संदर्भात जर कोणी अशाप्रकारे विद्यार्थ्यांची दिशाभूल करत असेल, तर ते चुकीचे आहे. विद्यापीठ अशा व्यक्तींवर कारवाई करेल. याशिवाय अशा अनियमिततेस सामोरे जाण्यासाठी एक योग्य धोरणही सिद्ध केले जाईल.’’