|
हरिद्वार (उत्तराखंड) – भारत अनंत काळापासून हिंदु राष्ट्र आहे आणि राहील; परंतु तथाकथित लोकांकडून याला ‘धर्मनिरेपक्ष’ शब्द जोडून पालटण्याचे षड्यंत्र रचण्यात आले. या संदर्भात राष्ट्रपतींना पत्र लिहिले असून त्यात ‘भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये न्यायसंगत पालट करावा आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द हटवून ‘हिंदु राष्ट्र’ शब्द लिहावा’, अशी मागणी आम्ही केली आहे, अशी माहिती शंकराचार्य परिषदेचे अध्यक्ष प.पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. या मागणीसाठी परिषदेकडून हरिद्वार येथून देशव्यापी महाअभियान राबवण्यास आरंभ करण्यात आला. ‘या अभियानानंतरही हिंदु राष्ट्राची मागणी मान्य झाली नाही, तर देहलीतील रस्त्यांवर संतांना उतरण्यास बाध्य व्हावे लागेल’, अशी चेतावणीही प.पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी या वेळी दिली. या संदर्भात उत्तराखंड, उत्तरप्रदेश, देहली, बंगाल आदी राज्यांतील अनेक ठिकाणी पंचायतही बोलावण्यात आली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.
प.पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज पुढे म्हणाले की, परिषदेच्या महाअभियानामध्ये देशभरातील साधू, संत, महंत, आखाडे, मठ, धर्मगुरु, तसेच सर्व शंकराचार्य यांचे हिंदु राष्ट्रासाठी समर्थन घेतले जाणार आहे. १० सहस्र संत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन पाठवतील. अखिल भारतीय आखाडा परिषदेने पाठिंबा दिल्यास या अभियानाला आणखी धार येईल.