सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीचे वार्तांकन

माड्याचीवाडी (तालुका कुडाळ) येथील श्री सद्गुरु भक्त सेवा न्यासाच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

सावंतवाडी – कोरोना महामारीने मृत्यू झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अशा कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कठीण प्रसंगी सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून श्री १०८ महंत मठाधीश प.पू. सद्गुरु श्री गावडे काका महाराज संचलित ‘श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी (तालुका कुडाळ)’ या संस्थेच्या वतीने तालुक्यातील बांदा आणि कारिवडे येथे अनेक गरीब अन् गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने वेंगुर्ला नगरपरिषदेला पीपीई किट आणि मास्क प्रदान

वेंगुर्ले – विश्‍व हिंदु परिषद प्रखंड, वेंगुर्लाच्या वतीने वेंगुर्ला नगरपरिषदेला ६० पीपीई किट आणि ५० मास्क नगराध्यक्ष राजन गिरप अन् मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यापूर्वीही विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने वेंगुर्ले नगरपरिषदेला पीपीई कीट, मास्क आणि ऑक्सीमीटर देण्यात आले होते. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे कोकण विभाग प्रकल्प प्रमुख डॉ. राजन शिरसाठ, वेंगर्ला प्रखंडाचे अध्यक्ष अरुण गोगटे, सहमंत्री महेश वेंगुर्लेकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई आदी उपस्थित होते.

राज्य सरकारने ७ सहस्र कोटी रुपये गरिबांसाठी खर्च करावेत ! – नीतेश राणे, आमदार, भाजप

कणकवली – कोरोनाची प्रतिबंधात्मक लस देशातील १८ वर्षांवरील सर्वांना विनामूल्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यापूर्वी एकरकमी धनादेश देऊन लस खरेदी करण्याची सिद्धता दर्शवणार्‍या महाराष्ट्र सरकारने आता लस खरेदी करावी लागणार नसल्याने वाचलेल्या ७ सहस्र कोटी रुपये निधीतून गरिबांसाठी काम करावे, अशी मागणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केली आहे.

सरपंचांचा विमा उतरवण्यास जिल्हा परिषदेची तत्त्वतः मान्यता ! – राजन तेली, जिल्हाध्यक्ष, भाजप

सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरपंचांचा विमा उतरवण्यास जिल्हा परिषदेने तत्त्वतः मान्यता दिली आहे. याविषयी ८ जूनला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी चर्चा केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे असा निर्णय घेणारा सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील पहिलाच जिल्हा असणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.

वरवडे प्राथमिक आरोग्यकेंद्राला सुसज्ज रुग्णवाहिका प्रदान 

कणकवली – पालकमंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांतून खनिकर्म विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका तालुक्यातील वरवडे प्राथमिक आरोग्यकेंद्राला सुपुर्द करण्यात आली. रुग्णवाहिका लोकार्पणाचा कार्यक्रम शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्रासाठीची रुग्णवाहिका माघारी बोलावल्याचा भाजपचा आरोप

सावंतवाडी – तालुक्यातील बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्रासाठी संमत झालेली रुग्णवाहिका माघारी बोलावणे, हे पालकमंत्री उदय सामंत यांचे श्रेयवादासाठीचे घाणेरडे राजकारण आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी आपली मागणी असल्याचे सावंतवाडीचे नगराध्यक्ष तथा भाजपचे प्रवक्ते संजू परब यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ भाजपचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

सिंधुदुर्ग – खनिकर्म विभागाकडून जिल्ह्यासाठी मिळालेल्या रुग्णवाहिका जिल्हा मुख्यालयात विनावापर उभ्या आहेत. जिल्ह्यातील लोकांचा रुग्णवाहिका नसल्याने जीव जात असतांना केवळ श्रेयवादासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी या रुग्णवाहिका अडवून ठेवल्या आहेत. त्या रुग्णवाहिका आवश्यक त्या प्राथमिक आरोग्यकेंद्रांना तात्काळ देण्यात याव्यात, या मागणीसाठी भाजपच्या वतीने ८ जूनला जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले, ‘‘एकीकडे अनेक लोकांचे जीव जात आहेत; मात्र पालकमंत्र्यांना त्याचे सुवेरसुतक नाही.’’

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत आणि उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी दुपारी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर काही कालावधीसाठी हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे नवीन ६५५ रुग्ण

१. उपचार चालू असलेले रुग्ण ६ सहस्र ८८९

२. २४ घंट्यांत मृत्यू झालेले रुग्ण ९

३. मृत्यू झालेले एकूण रुग्ण ७८९

४. बरे झालेले रुग्ण २३ सहस्र ७७६

५. एकूण कोरोनाबाधित रुग्ण ३१ सहस्र ४६०