हिंदु वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर धर्मांतर केलेल्या ख्रिस्ती मुलाकडून मृतदेह पुरण्याची मागणी नातीने फेटाळत केले अंत्यसंस्कार !

हिंदु संस्कारानुसार कृती करणार्‍या अशा तरुणींकडून हिंदूंनी आदर्श घ्यावा !

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – येथे कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्या एका वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिच्या खिस्ती धर्म स्वीकारलेल्या मुलाने नकार दिला. त्यावर वृद्धेची नात झारखंड येथून १ सहस्र १०० किमी अंतरावरून येऊन तिने मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याची घटना समोर आली आहे.

सरोज देवी असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. धर्म प्रताप सिंह या तिच्या मुलाने धर्मांतर करून डेविड असे नाव ठेवले आहे. डेविडने ‘ख्रिस्ती धर्मानुसार सरोज देवी यांना पुरण्यात यावे’, असे म्हटले होते. त्याला नात श्‍वेता सुमन हिने विरोध केला. ‘आजीने धर्मांतर केलेले नसल्याने तिच्या मृतदेहावर सनातन धर्मानुसारच अंत्यसंस्कार करण्यात येईल’, असे तिने सांगितले. मामा असलेल्या डेविडकडून अशा प्रकारची मागणी करण्यामागे कोण आहे, याच्या चौकशीची मागणीही श्‍वेताने पोलिसांकडे केली आहे. तिने जिल्हाधिकार्‍यांनाही ही विनंती केली आहे.