वर्षा ऋतूचर्या – पावसाळ्यात निरोगी रहाण्याचा आयुर्वेदीय कानमंत्र !

आता थोड्याच दिवसांत पावसाळा चालू होईल. पावसाळ्यात निरोगी रहाण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी ? पावसाळ्यात आहारात कोणते पदार्थ खावेत ? तसेच कोणते पदार्थ खाऊ नयेत ? आणि पावसाळ्यातील विकारांना कसा अटकाव करावा ? याविषयीची सविस्तर माहिती या लेखात पाहूया !

वैद्य मेघराज पराडकर

१. पावसाळ्यात रोगनिर्मितीस कारणीभूत घटक

‘पावसाळ्यापूर्वीच्या उन्हाळ्यामध्ये शरिरात कोरडेपणा आलेला असतो, शरिराची शक्ती न्यून झालेली असते. कडक उन्हानंतर वातावरणात अचानक पालट होऊन पावसामुळे गारठा निर्माण होतो. हवेतील आर्द्रताही वाढते. त्यामुळे शरिरातील वातदोष वाढतो. वातावरणात, विशेषतः वनस्पती, धान्ये, पाणी इत्यादी सर्वच ठिकाणी आम्लता वाढत असल्याने पित्त साचण्याकडे शरिराचा कल असतो. या दिवसांत पचनशक्तीही घटते. भूक मंदावल्यामुळे अपचनाचे विकार होतात. पावसाच्या पाण्यासह धूळ, कचरा वाहून आल्याने पाणी दूषित होते आणि तेही रोगनिर्मितीस कारण ठरते. या सर्व घडामोडींमुळे वाताचे विकार, उदा. संधीवात, आमवात यांसह जुलाब, अजीर्ण इत्यादी अपचनजन्य विकार बळावतात.

२ आ. लंघन (उपवास) : आठवड्यातून एकदा लंघन किंवा उपवास करावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवसभर काहीही न खाता रहावे. अगदीच भूक लागल्यास साळीच्या लाह्या खाव्यात. हे शक्य नसलेल्यांनी भर्जित (भाजलेल्या) धान्याचे पदार्थ किंवा लघू आहार (साळीच्या लाह्या, मुगाचे वरण यांसारखा पचण्यास हलका असा आहार) घेऊन लंघन करावे. पावसाळ्यात एकभुक्त राहणे, म्हणजे दुपारी व्यवस्थित जेवण घेऊन रात्री न जेवणे अनेकांना उपयुक्त ठरते.

२. पावसाळ्यात घ्यावयाची विशेष काळजी 

अ. सर्व पांघरुणे, उबदार कपडे यांना पावसाळ्यापूर्वीच उन्हाळ्यात ऊन दाखवून ठेवावे.

आ. पावसाळ्यात स्नानासाठी कोमट किंवा गरम पाणी वापरावे.

इ. ओलसर किंवा दमट जागेत राहू नये.

ई. ओलसर किंवा दमट कपडे घालू नयेत.

उ. सतत पाण्यात काम करू नये.

ऊ. पावसात भिजू नये. त्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. भिजल्यास त्वरित कोरडे कपडे घालावेत.

ए. पावसाळ्यातील गारठ्यापासूनही संरक्षण करावे.

ऐ. जागरणामुळे शरिरातील रूक्षता वाढून वात वाढत असल्याने रात्रीचे जागरण टाळावे.

ओ. दिवसा झोपू नये.

३. माश्या आणि डास यांना प्रतिबंध करणारे नैसर्गिक उपाय

या काळात माश्या आणि डास यांचेही प्रमाण वाढते. याला प्रतिबंध करण्यासाठी पुढील उपाय करावेत. –

अ. घरात कडूनिंबाची पाने, लसणाची साले, धूप, ऊद, ओवा यांचा धूर फिरवावा.

आ. घराच्या सभोवती झाडे असल्यास त्यांवर गोमूत्राचा फवारा मारावा.

इ. घराच्या आत वेखंडाचे रोप असलेली कुंडी ठेवावी. यामुळे डासांचे प्रमाण अल्प होते.

ई. सायंकाळच्या वेळी गुडनाईटच्या कॉईलवर लसणाची पाकळी ठेऊन स्विच चालू करावा. यामुळे डासांचे प्रमाण नियंत्रित होण्यास साहाय्य होते.

४. पावसाळ्यातील विकारांना असा अटकाव करा !

पावसाळ्यातील प्रमुख लक्षण म्हणजे भूक मंदावणे. भूक मंदावलेली असतांनाही पूर्वीसारखाच आहार घेतला, तर ते अनेक रोगांना आमंत्रणच ठरते; कारण मंदावलेली भूक किंवा पचनशक्ती हे बहुतेक विकारांचे मूळ कारण आहे. पोट जड वाटणे, करपट ढेकर येणे, गॅसेस (पोटात वायू) होणे, ही भूक मंदावल्याची लक्षणे आहेत. अशा वेळी हलके अन्न, उदा. पेज, कढणे, भाजून केलेले पदार्थ घ्यावेत. अल्प प्रमाणात खावे. पोट जड असतांनाही आहार चालू ठेवल्यास अजीर्ण, जुलाब, आव पडणे हे विकार चालू होतात.

५ अ. पचनशक्ती वाढवणारी सोपी घरगुती औषधे

५ अ १. पाचक ताक : एक पेला गोड ताजे ताक घेऊन त्यात सुंठ, जिरे, ओवा, हिंग, सैंधव, मिरे यांची १-१ चिमूट पूड घालून एकजीव करावे. दिवसातून २-३ वेळा घ्यावे.

५ अ २. पाचक मिश्रण : आले किसून त्यात ते भिजेल इतका लिंबाचा रस घालावा, चवीनुसार सैंधव घालावे. हे मिश्रण काचेच्या बरणीत भरून ठेवावे. जेवणापूर्वी १-२ चमचे प्रमाणात घ्यावे.

५ अ ३. सुंठ-साखर मिश्रण : १ वाटी सुंठ पूड आणि तेवढ्याच प्रमाणात साखर घेऊन मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करून ठेवावी. हे मिश्रण बरणीत भरून ठेवावे. दोन्ही वेळा जेवणापूर्वी १-१ चमचा घ्यावे. यामुळे शुद्ध ढेकर येऊन चांगली भूक लागते, तसेच पित्ताचा त्रासही घटतो.

५ आ. सर्वांगाला प्रतिदिन तेल लावा ! : पावसाळ्यात सर्वांगाला नियमितपणे तेल लावावे. हे तेल सांध्यांना अधिक वेळ चोळावे. पावसाळ्यात हवेत आर्द्रता आणि गारठा असल्याने उष्ण गुणाचे तीळ तेल किंवा मोहरीचे तेल वापरावे, खोबरेल तेल वापरू नये. (पावसाळा सोडून अन्य ऋतूंमध्ये खोबरेल तेल वापरू शकतो.) तेल लावल्यावर सूर्यनमस्कार, योगासने यांसारखा हलका व्यायाम करावा. अंग दुखणे, वेदना इत्यादी लक्षणे असल्यास गरम पाण्याच्या पिशवीने किंवा ‘हीटिंग पॅड’ने शेक घ्यावा. अंघोळीच्या वेळी शेक घ्यायचा झाल्यास सोसेल एवढे कढत पाणी वापरावे.’

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

पावसाळ्यातील आहारात काय खावे ? आणि काय खाऊ नये ?

टीप : धर्मशास्त्रानुसार मद्य आणि मांस यांचे सेवन निषिद्ध आहे; तरीही आजकाल मद्य आणि मांस सेवन करणार्‍यांना त्यांचे गुणदोष समजावेत, म्हणून येथे दिले आहेत.

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (५.६.२०२१)