भाजपचे राष्ट्रीय नेते डॉ. अनिर्बान गांगुली यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गोव्यातील भाजपचे नेते, मंत्री आणि कार्यकर्ते यांना संबोधन
पणजी, ४ जून (वार्ता.) – पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचारामागे रोहिंग्यांचा हात आहे. ‘रोहिंग्यांना शरणार्थी म्हणून स्वीकारू नये, तर त्यांना ब्रह्मदेशात परत पाठवावे’, अशी केंद्रशासनाची ठाम भूमिका असतांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी रोहिंग्यांना शरण देण्याची भूमिका घेतली. त्या बदल्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांना अमानुष मारहाण करणे, महिलांवर अत्याचार करणे, अशी कामे करून रोहिंग्या मुसलमान भारताने केलेल्या उपकारांचे पांग फेडत आहेत.
पंचायत निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज प्रविष्ट करण्यापासून रोखणे, प्रचाराला गेल्यास मारहाण करणे आदी कृत्ये केली जात आहेत. त्या वेळीही भाजपच्या ६७ कार्यकर्त्यांनी प्राण गमावले होते. तेव्हापासून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचा हा प्रवास चालू आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा विचार झाला पाहिजे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय नेते डॉ. अनिर्बान गांगुली यांनी केले. डॉ. अनिर्बान गांगुली हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून गोव्यातील भाजपचे नेते, मंत्री आणि कार्यकर्ते यांना पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराविषयी माहिती देत होते.
या कार्यक्रमाला गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. अनिर्बान गांगुली पुढे म्हणाले, ‘‘पश्चिम बंगालमध्ये अतिरेक्यांना अभय देण्यात येते. शिधापत्रिकेवरील धान्य असेल किंवा सरकारी योजना यांचा लाभ असेल, हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशिवाय अन्य कुणालाही दिला जात नाही. या ठिकाणी एक प्रकारची राजकीय विकृती आहे. निवडून आलेल्या अनुसूचित जातींच्या ६४ आमदारांपैकी ३५ आमदार हे भाजपचे आहेत. आदिवासी समाजातील १६ आमदारांपैकी ९ आमदार हे भाजपचे आहेत. यामुळे पश्चिम बंगालमध्ये अनुसूचित जाती, जमाती यांना सत्ताधार्यांकडून लक्ष्य करण्यात येत असल्याने त्यांना जिवाच्या आकांताने पळून जाण्याची वेळ आणली जात आहे.’’
पश्चिम बंगालमध्ये सरकार पुरस्कृत हिंसाचार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा राज्य
पश्चिम बंगालमधील हिंसाचार हा सरकार पुरस्कृत आहे. तेथील पोलीस अशा घटनांमध्ये बघ्याची भूमिका घेत आहेत. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची दृश्ये अंगावर शहारे आणणारी आहेत. तेथे दिवसागणिक लोकशाहीचा खून होत आहे. संपूर्ण मानवजातीची मान लज्जेने झुकावी, असा संहार त्या ठिकाणी केला जात आहे. भाजप कार्यकर्त्यांनी तेथे केलेले बलीदान वाया जाणार नाही, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी व्यक्त केले.