पुणे – ग्रीन, क्लीन अँड स्मार्ट म्युझियम या राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या प्रकल्पाला जर्मनीच्या फेडरल फॉरेन ऑफिस आणि मुंबई येथील जर्मन दूतावासाने मंजुरी दिली आहे. राजा केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे आणि जर्मन दूतावासातील महावाणिज्य दूत डॉ. ज्युरगन मोरहार्ड यांनी या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या अंतर्गत केळकर संग्रहालयाला ४० लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे.
या करारामुळे संग्रहालय आधुनिक होण्यास मदत होईल, असा विश्वास सुधन्वा रानडे यांनी व्यक्त केला. डॉ. दिनकर गंगाधर केळकर या एका व्यक्तीने संकलित केलेल्या दुर्मिळ वस्तूंचे संकलन हे राजा केळकर संग्रहालय याचे वैशिष्ट्य आहे. जर्मन फेडरल फॉरेन ऑफिसकडून मिळालेल्या निधीचा उपयोग वस्तू प्रदर्शनाचा दर्जा सुधारणे, संग्रहालयाचे संकेतस्थळ अद्ययावत करणे, मोबाईल ॲप विकसित करणे आणि थ्रीडी व्हर्चुअल टूर व्यापक स्तरावर विकसित करण्यासाठी करणार असल्याचे रानडे यांनी सांगितले, तसेच या करारामुळे जर्मन सरकार आणि संग्रहालय यांच्यातील ऋणानुबंध दृढ झाला असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.