स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनी देश चालला असता, तर अमेरिकाही मागे पडली असती !

भाग्यनगर येथील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापिठाचे कुलगुरु फिरोज अहमद बख्त यांची स्पष्टोक्ती !

यावरून उद्या काँग्रेसी आणि सावरकरद्वेषी यांनी आगपाखड केल्यास आणि धर्मांधांनी फिरोज अहमद बख्त यांना बहिष्कृत करण्याचे आवाहन केल्यास आश्‍चर्य ते काय ?

मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापिठाचे कुलगुरु फिरोज अहमद बख्त

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तीमत्त्व, विद्वत्ता, प्रतिभा इतकी उदात्त होती की, त्या वेळच्या कोणत्याही स्वदेशी नेत्यांच्या तुलनेत त्यांचे श्रेष्ठत्व प्रखर उठून दिसत होते. यामुळेच काँग्रेस आणि पाश्‍चिमात्य विचारांच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा मलीन करण्यात धन्यता मानली. आज स्वातंत्र्यवीर सावरकर असते आणि त्यांच्याकडे महत्त्वाचे पद असते, तर आज भारत निश्‍चितच अमेरिकेच्या पुढे असता, असा विश्‍वास भाग्यनगर येथील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापिठाचे कुलगुरु फिरोज अहमद बख्त यांनी व्यक्त केला. बख्त हे मौलाना आझाद यांचे वंशज आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वीर सावरकर आज असते…’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ व्याख्यानात ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद विलासपूर येथील गुरु घासीदास केंद्रीय विद्यापिठाचे कुलाधिपती डॉ. अशोक मोडक यांनी भूषवले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र साठे यांनी सूत्रसंचालन केले, तर सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विनोद पवार यांनी आभार प्रदर्शन केले. या व्याख्यानाचा लाभ १७ राज्यांतील सावरकरप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी घेतला. ‘वन्दे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.

या वेळी मार्गदर्शन करतांना फिरोज अहमद बख्त म्हणाले,

१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडे द्रष्टेपणा होता.

२. काँग्रेसच्या नेत्यांची संपूर्ण हयात उजव्या विचारांच्या कर्तृत्ववान नेत्यांना न्यून लेखण्यात गेली.

३. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या काही यातना बंदीगृहात भोगल्या, तशा यातना त्या काळच्या एकाही सर्वोच्च नेत्यांना भोगाव्या लागल्या नाहीत.

४. सावरकर यांचा आत्मिक संयम, सहनशीलता, कणखरपणा आणि मृत्यूशी झुंजण्याची जिद्द अशा गुणांमुळे त्यांनी अलौकिक वीरत्व प्राप्त केले.

५. आजच्या मराठी आणि हिंदी प्रसारमाध्यमांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीची विस्तृत नोंद घेऊ नये, हे आश्‍चर्यकारक आहे.

६. स्वदेशी लोकांच्या घृणेमुळेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मूर्ती संसदेच्या आवारात विलंबाने स्थापित होणे आणि त्यांना अद्यापही भारतरत्न न मिळणे, या शोकांतिका आहेत.