सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांनी आपापसांत समन्वय ठेवावा. प्रत्येक विभागाकडे असणारी साधनसामग्री सुस्थितीत ठेवून ती सज्ज ठेवावी. विशेषतः आरोग्य विभागाने आवश्यक त्या औषधसाठ्यांसह ‘पॉवर बॅकअप’ ठेवावा, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व सिद्धतेची आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील, दक्षिण कोकण पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजयकुमार थोरात, नगर प्रशासन अधिकारी वैभव साबळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी या वेळी केलेल्या सूचना
१. ‘तौक्ते’ वादळाच्या अनुषंगाने आपणा सर्वांची सिद्धता झाली असली, तरी त्यामध्ये सतर्कता हवी. पाटबंधारे विभागाने तिलारी प्रकल्पातील पाण्याचे सनियंत्रण करावे. पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी त्याविषयीची पूर्वसूचना देण्याचे नियोजन करावे.
२. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता बंद झाल्यास तो तात्काळ पूर्ववत् करण्यासाठी साधनसामग्री सिद्ध ठेवावी. सर्वच विभागांकडे असणारी साधनसामग्री सिद्ध असावी. आरोग्य विभागाने कोरोनासह लेप्टो, तसेच सर्पदंश यांसारख्या घटनांच्या अनुषंगाने आवश्यक तो औषधसाठा ठेवावा. तसेच आरोग्य विभागाने ‘पॉवर बॅकअप’(वीजपुरवठा खंडित झाल्यास केलेली पर्यायी व्यवस्था’) ठेवायला हवा.
३. तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी आपल्या स्तरावर बैठक घ्यावी. संभाव्य निवारा केंद्रांसाठी ठिकाणे शोधावीत. निवारा केंद्राच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे सुस्थितीत असावीत. आवश्यक सुविधा सिद्ध हव्यात. आवश्यक त्या ठिकाणी ‘टॅँकर्स’चे नियोजन असायला हवे. धोकादायक इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ झाले आहे का ? यावर लक्ष देऊन मुख्याधिकार्यांनी त्याविषयी उपाययोजना कराव्यात.
या वेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, बी.एस्.एन.एल्.चे अधिकारी, मत्स्यव्यवसाय विभागाचे साहाय्यक आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आदी विभागांच्या अधिकार्यांनी सहभाग घेतला होता.