स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये व्हिडिओजचे प्रक्षेपण !
मुंबई, २८ मे (वार्ता.) – राष्ट्रासाठी सर्वस्व वाहिलेले क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची २८ मे या दिवशी १३८ वी जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र, तसेच भारतातील अनेक राज्यांमध्ये या निमित्ताने विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या वतीनेही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनपटावर आधारित व्हिडिओज्चे ‘यू ट्यूब चॅनेल’वरून प्रसारण करण्यात आले. मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये बनवण्यात आलेल्या या व्हिडिओज्ना हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानातील कारावासात नरकयातनासम हालअपेष्टा सोसल्या. वर्ष १९२० मध्ये त्यांच्या सुटकेसाठी भारतभरात आंदोलने करण्यात आली होती. जनरेट्यापुढे हात टेकत ब्रिटिशांनी सावरकर यांना १० वर्षांनी का असेना अंदमानातून मुक्त करत रत्नागिरी येथील कारागृहात स्थानबद्ध केले.
२. या घटनेला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने अंदमानातील ‘कालापानी’ येथे सावरकर यांनी भोगलेल्या अनन्वित अत्याचारांचा वृत्तांत देणारे व्हिडिओ ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांनी आपल्या ‘यू ट्यूब चॅनेल’द्वारे प्रसारित केले.
३. या व्हिडिओज्ना विविध सामाजिक माध्यमांवरूनही व्यापक प्रमाणात समाजापर्यंत पोचवण्यात आले. यांना सहस्रावधी लोकांनी पाहिले असून अनेकांनी ‘सनातन प्रभात’च्या विविध ठिकाणच्या प्रतिनिधींकडे ‘अशा प्रकारचे व्हिडिओ आगामी काळात बनवून राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी जागृती करावी’, असे आवाहन केले.
४. सावरकर यांच्यावर करण्यात आलेल्या अत्याचारांवर प्रकाश टाकणारे व्हिडिओज् बनवण्यामध्ये वर्ष २००१ मध्ये प्रसारित झालेला सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट ‘वीर सावरकर’चे निर्माते ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’ या संघटनेचे विशेष सहकार्य लाभले.