राजभवनातून धारिका गहाळ झाल्याप्रकरणी शिवसेना पुणे शहरच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन

(गोलामध्ये ) पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देताना शहरप्रमुख श्री संजय मोरे अणि अन्य उपस्थित, (उजवीकडे) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

पुणे – विधान परिषदेसाठी शिफारस करण्यात आलेल्या १२ सदस्यांच्या नावाची धारिका राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे देण्यात आली होती. राज्यपालांनी १२ नावे गहाळ झाल्याचे सांगितले. १२ आमदारांची सूची राज्यभवनासारख्या सुरक्षित जागेतून हरवतेच कशी ? हरवल्याचे कळल्यावर लगेच तक्रार का नोंद केली नाही? असा प्रश्‍न उपस्थित करत २६ मे या दिवशी शिवसेना पुणे शहरच्या वतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देण्यात आले. शहरप्रमुख श्री संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर समन्वयक आनंद दवे यांनी हे निवेदन दिले. धारिका गहाळ झाल्याचे ऐकल्यानंतर शिवसेनेने राजभवन आणि भाजपकडे विचारणा केली असता त्यानंतर धारिका सापडली असल्याचे राजभवनाकडून सांगण्यात आले.

तक्रारदारांनी म्हटले आहे की, ‘स्वराज्यातून गवताची एक काडीसुद्धा हरवता कामा नये’, असा आदेश देणार्‍या छत्रपतींच्या राज्याच्या राजभवनातून कागदपत्रे गायब होतात आणि ते मान्य केले जाते हा महाराष्ट्र आणि महाराज या दोघांचा अपमान आहे. त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. ‘सीसीटिव्ही कॅमेरे’ कह्यात घ्यावेत, म्हणजे सत्य बाहेर येईल. मंत्रीमंडळाने दिलेली कागदपत्रे गहाळ होत असतील, तर त्याचे नैतिक दायित्व कोणाचे ?