संभाजीनगर येथे देयक भरण्यावरून झालेल्या वादामुळे कोरोनाबाधिताचा मृतदेह देण्यात विलंब !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

संभाजीनगर – येथील सिडको वाळूज महानगरमधील कोरोनाबाधित रुग्णावर बजाजनगरमधील ममता मेमोरियल रुग्णालयामध्ये ३ मेपासून उपचार चालू होते. २४ मे या दिवशी दुपारी १२ वाजता या रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर देयक न भरल्याने रुग्णालय प्रशासनाने मृतदेह देण्यास नकार दिल्याचा आरोप नातेवाइकांनी केला, तर ‘देयक भरून मृतदेह कह्यात घेण्यासाठी नातेवाईक पुढे न आल्याने विलंब झाला आहे’, असा खुलासा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. या प्रकरणात स्थानिक नेते आणि पोलीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेर सायंकाळी नातेवाइकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

१. नातेवाईक आणि रुग्णालय प्रशासन यांच्यामध्ये थकित १ लाख १९ सहस्र रुपयांच्या देयकापोटी शाब्दिक चकमक झाली. मृताचे नातेवाईक आणि मित्र यांनी भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वीय साहाय्यकास दूरभाष करून याची माहिती दिली होती.

२. त्यानंतर १ लाख १९ सहस्र रुपयांचे देयक न्यून करून ते ८० सहस्र रुपये करण्यात आले. ही रक्कमही भरण्यास नातेवाइकांनी असमर्थता दर्शवली.

३. त्यानंतर पोलीस फौजदार प्रीती फड पोलीस पथकासह रुग्णालयात आल्या. फड यांनी ‘भरण्यास पुरेसे पैसे नव्हते, तर रुग्णाला शासकीय रुग्णालयात का हालवले नाही ?’ अशी विचारणा केली, तसेच ‘मृतदेह देण्यास नकार दिला आणि त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, अशी ताकीद रुग्णालयातील आधुनिक वैद्य सुदाम चव्हाण यांना दिली.

४. अखेर बजाजनगर-वडगाव कोल्हाटीचे सरपंच सचिन गरड आणि त्याच्या सहकार्‍यांनी  पुढाकार घेतला. शेवटी नातेवाइकांनी ४० सहस्र रुपये भरण्याची सिद्धता दर्शवल्यानंतर प्रकरण निवळले.

नियमानुसार देयक आकारले होते !

‘देयक भरण्याची परिस्थिती असूनही रुग्णांचे नातेवाईक आणि मित्र यांनी राजकारणी अन् पोलीस यांच्याकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार देयक घेतले. असे प्रकार घडत असतील, तर गंभीर रुग्णांवर उपचार कसे करावेत ?’ – आधुनिक वैद्य सुदाम चव्हाण