साहाय्याचे स्वरूप योग्य होते का ? – खासदार गौतम गंभीर यांना देहली उच्च न्यायालयाचा प्रश्‍न

रेमडेसिविर आणि फॅबिफ्लू औषधांचे मोठ्या प्रमाणात विनामूल्य वाटप केल्याचे प्रकरण

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – देहलीतील भाजपचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी काही आठवड्यांपूर्वी देहलीतील नागरिकांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन आणि फॅबीफ्लू या औषधांचे विनामूल्य वाटप केले होते. तेव्हा ही औषधे बाजारात उपलब्ध होत नव्हती. यावरून देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. त्याच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने गौतम गंभीर यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला आहे.

१. न्यायालयाने म्हटले की, गौतम गंभीर एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू राहिले आहेत. ते आता एक राजकीय नेतेही आहे. त्यांनी गरजूंना रेमडेसिविर आणि फॅबिफ्लू ही औषधे वाटली; पण त्यांनी केलेल्या साहाय्याचे स्वरूप योग्य होते का ? त्यांच्या वागण्याला ‘उत्तरदायी नागरिकाचे वागणे’ असे म्हणता येईल का ? देशात जेव्हा या औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला असतांना त्याचा साठा आपल्याकडे करणे योग्य ठरेल का ? याचा विचार त्यांनी का नाही केला ? गौतम गंभीर यांना कुणाच्या प्रिस्क्रिप्शनने इतक्या मोठ्या प्रमाणात औषधे उपलब्ध करून दिली गेली, असाही प्रश्‍न न्यायालयाने विचारला.

२. ‘ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने या प्रकरणात लक्ष घालावे आणि औषधांचा असा मोठ्या प्रमाणात साठा करणे गुन्हा नाही का ?’ याची पडताळणी करून योग्य ती कारवाई करावी, अशा सूचना न्यायालयाने केली आहे.

३. एकट्या गौतम गंभीर यांच्यावर नव्हे, तर ज्या डॉक्टरने इतक्या मोठ्या प्रमाणात औषधे मागवण्यासाठी प्रिस्क्रिप्शन दिले, ज्या केमिस्टने पुरवठा केला, या सर्वांची माहिती घेऊन त्यांना यात उत्तरदायी धरावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.