|
संभाजीनगर – जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘आपत्ती व्यवस्थापन कक्ष’ भंगार आणि नादुरुस्त साधनसामग्रीवर अवलंबून आहे. पुरेसे मनुष्यबळ तर नाहीच; पण जिल्ह्यात कुठेही आगीची घटना घडल्यास या विभागाला महापालिकेच्या अग्नीशमन दलावर अवलंबून रहावे लागते. जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये ८५४ समित्या आहेत; मात्र एकाही गावाचा ‘आपत्ती व्यवस्थापन आराखडा’ सिद्ध करण्यात आला नाही.
जिल्ह्याला अतीवृष्टी, पूर, वादळाचा तडाखा बसल्यास हा विभाग त्याचे योग्य व्यवस्थापन करू शकणार नाही, अशी स्थिती आहे. गेल्या २ वर्षांपासून विभागाकडे पुरेसा निधी नाही. जिल्ह्यातील ९ तालुक्यांत १ सहस्र ३४१ गावे आहेत. शहरी आणि ग्रामीण मिळून ५० लाखांवर लोकसंख्या आहे. जिल्ह्यात ८६१ ग्रामपंचायती आहेत; मात्र पावसाळा तोंडावर असतांना गावांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्याप सिद्ध नाहीत. यात संभाव्य धोके आणि आपत्ती यांचा इतिहास यांची माहिती होणे अपेक्षित आहे. आवश्यक साधनसामग्री, प्रतिसादाची कृती, गावाची लोकसंख्या, शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी, समाजमंदिर, मंगल कार्यालये, रिकामी गोदामे, रुग्णालये, आरोग्य केंद्र, जनावरांचे दवाखाने, वैद्यकीय अधिकारी, खासगी दवाखाने, सेवाभावी संस्था, पोहणार्या व्यक्ती, गावातील दूरभाष क्रमांक, औषध आणि स्वस्त धान्य दुकाने, गावातील वाहने, अशी सर्वच प्रकारची माहिती त्यात संकलित करणे अपेक्षित आहे; मात्र अद्याप हे महत्त्वाचे काम झालेले नाही.