मंत्री विजय वडेट्टीवार यांचा मराठा समाज कार्यकर्त्यांकडून निषेध, तर देवबाग येथे वाहनांचा ताफा अडवला

विजय वडेट्टीवार

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात चक्रीवादळाने झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाच्या विरोधात यापूर्वी वक्तव्य केल्याचा आरोप करत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला. या वेळी पोलिसांनी मराठा समाजाच्या ३० कार्यकर्त्यांना कह्यात घेतले, तर मालवण तालुक्यातील देवबाग येथे पाण्याची समस्या तीव्र असल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी एका ग्रामस्थाने मंत्री वडेट्टीवार यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर भांडी ठेवून रस्ता अडवला.

मंत्री वडेट्टीवार यांची निवासव्यवस्था ओरोस येथील शासकीय विश्रामगृहावर करण्यात आली होती. कडक पोलीस बंदोबस्त असतांनाही मराठा समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मंत्री वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणा द्यायला प्रारंभ केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले. ही घटना २१ मे या दिवशी घडली.

याविषयी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक अधिवक्ता सुहास सावंत म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाच्या विषयाला मंत्री वडेट्टीवार यांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही घटनेच्या चौकटीत राहून आरक्षण मागत आहोत. यापुढे कोणत्याही मंत्र्याने असे वक्तव्य केल्यास त्यांना याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. यापुढची आंदोलनाची दिशा खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या सूचनेनुसार ठरणार आहे.’’

पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी देवबाग येथे अडवला मंत्री वडेट्टीवार यांच्या वाहनांचा ताफा

चक्रीवादळामुळे देवबागमध्ये एक आठवडा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मंत्री आणि पुढारी गावात येतात; पण ग्रामस्थांच्या व्यथा समजून घेत नसल्याचा आरोप करत देवबाग येथील एका ग्रामस्थाने देवबागच्या दौर्‍यावर आलेले काँग्रेसचे नेते तथा मंत्री वडेट्टीवार यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर रिकाम्या घागरी ठेवून रस्ता अडवला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. या वेळी पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी स्वत: गाडीतून उतरून रस्ता मोकळा केला. त्यानंतर मंत्री वडेट्टीवार यांच्या वाहनांचा ताफा निघून गेला. या वेळी ‘मंत्र्यांनी आमचे म्हणणे तरी ऐकून घ्यायला हवे होते’, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.