‘‘तुम्ही आमचा अपमान करत आहात !’’ – खासदार संजय राऊत यांची राज्यपालांवर टीका

विधानपरिषदेत राज्यपालनियुक्त सदस्यांची निवड न करण्यावरून खासदार संजय राऊत यांची राज्यपालांवर टीका

(डावीकडे) संजय राऊत, (उजवीकडे) भगतसिंह कोश्यारी

मुंबई – राज्यपालनियुक्त सदस्यांची नियुक्ती न करणे, हा राज्यघटनेचा भंग आहे. तुम्ही आमचा अपमान करत आहात, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेविषयी असंतोष व्यक्त केला. विधान परिषदेत १२ राज्यपालनियुक्त सदस्यांची निवड करण्यासाठी राज्यशासनाने मागील वर्षी १२ सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह यांच्याकडे पाठवली आहेत; मात्र राज्यपालांनी ती अद्याप संमत केलेली नाहीत. मुंबई उच्च न्यायालयानेही एका जनहित याचिकेच्या सुनावणीमध्ये राज्यपालांना याविषयी विचारणा केली आहे.

संजय राऊत म्हणाले, ‘‘उच्च न्यायालयाने विचारला, तसाच आम्हीही प्रश्‍न विचारतो. राज्यघटनेने राज्यपालांना अधिकार दिला आहे. १ वर्ष होऊनही आपले राज्यपाल महोदय त्या धारिकेकडे ढुंकून पहायला सिद्ध नाहीत. हे १२ सदस्य साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्येकर्ते आहेत. १२ सदस्य वेळेवर नियुक्त झाले असते, तर आज कोरोनाचे संकट किंवा तौक्ते चक्रीवादळ या संकटात हे आमदार काम करत राहिले असते. या सदस्यांना नियुक्त करणे हे २ मिनिटांचे काम आहे. तुम्ही किती वेळापर्यंत धारिकेवर बसून रहाणार ?’’