मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती !

 

(उजवीकडे) परमबीर सिंह

मुंबई – राज्यशासन आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यात काय बिनसले आहे ? हे जाणून घेण्यात आम्हाला रस नाही; मात्र परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे पत्र लिहिल्यावरच त्यांच्या विरोधात गुन्हे कसे नोंदवले गेले ? याचे उत्तर आम्हाला द्या, असा प्रश्‍न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या अटकेला २४ मेपर्यंत स्थगितीचा अंतरिम आदेश दिला आहे. ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या अंतर्गत नोंदवलेला गुन्हा रहित करावा, यासाठी परमबीर यांनी न्यायालयात केलेल्या याचिकेवर २१ मेच्या रात्री न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली.

या प्रकरणी राज्यशासनाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे आणि परमबीर सिंह यांच्यात मतभेद असतीलही; मात्र त्याचा इथे संबंध नाही. घाडगे यांच्या तक्रारीत तथ्य वाटले म्हणून गुन्हा नोंद झाला. हे सूडबुद्धीतून किंवा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले म्हणून केलेले नाही. परमबीर सिंह यांची बाजू मांडतांना अधिवक्ता म्हणाले, ‘परमबीर यांच्या विरोधात घाडगे यांनी वर्ष २०१५ मध्ये ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याच्या अंतर्गत तक्रार दिली असतांना ५ वर्षांनी गुन्हा नोंदवण्याचे कारण काय ? पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी अन्वेषणातून माघार का घेतली ? ते राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर कायम आहेत. याचा अर्थ ते राज्य सरकारच्या वतीने परमबीर सिंह यांच्याशी वाटाघाटी करत होते, हे स्पष्ट आहे.’ या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ मे या दिवशी होणार आहे.