नलगे द्यावा जीव सहजचि जाणार ।
आहे तो विचार जाणा काही ॥ १ ॥
मरण जो मागे गाढवाचा बाळ ।
बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥ २ ॥
तुका म्हणे कई होईल स्वहित ।
निधान जो थीत टाकू पाहे ॥ ३ ॥
– संत तुकाराम महाराज
‘अमूल्य आणि दुर्लभ मनुष्यजन्माचे महत्त्व लक्षात न घेता क्षुल्लक कारणास्तव जीव देत आहेत. ही अतिशय निंदनीय गोष्ट असून त्याच्यासारखे पाप कर्म नाही. ब्रह्महत्येला महापातक म्हटले आहे. यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, ‘बाबांनो, का जीव देता ? मरण तर ठरलेलेच आहे, मग मुद्दाम मरण का स्वीकारता ? जो मरण मागतो, तो गाढव पुत्र म्हटला पाहिजे, म्हणजे तो शुद्ध गाढवपणा आहे. त्याला ‘शुद्ध चांडाळ’ म्हणावे. अशांची इतकी घोर निंदा संतांनी केली आहे. मरण मागणे म्हणजे भित्रेपणा होय. खरेतर सर्व शास्त्रे, साधू, संत हेच सांगतात की, अन्य कुठल्याही योनीपेक्षा मनुष्ययोनी श्रेष्ठ आहे. याच मानवी देहात येऊन ईश्वरप्राप्तीची ब्रह्मानुभूती घेता येते. श्रेष्ठ कार्य कर्तृत्व गाजवून स्वतःसमवेतच जगाला सुखी करता येते. एवढी पात्रता मनुष्य देहात असतांना ही संधी जीव देऊन व्यर्थ का घालवता ? हा पळपुटेपणा न करता समर्थपणे जगावे आणि मरणालाच मारून टाकावे. हाच खरा पुरुषार्थ आहे. किती सुंदर उपदेश आहे हा !’
(संदर्भ : ‘लोकजागर’, ८.३.२०१५)