‘व्हेंटिलेटर्स’च्या अभावामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्राण जात असतांना नादुरुस्त ‘व्हेंटिलेटर्स’ दुरुस्त करण्याविषयी प्रशासनाची उदासीनता अक्षम्य आहे. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होऊन दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
मुंबई – राज्यात कोरोनाची भयंकर स्थिती असतांना, तसेच रुग्णांसाठी ‘व्हेंटिलेटर्स’ अल्प पडत असतांना महाराष्ट्राला पंतप्रधान निधीतून मिळालेल्या ४ सहस्र ४२७ पैकी ८७५ ‘व्हेंटिलेटर्स’ दुरुस्तीच्या कारणास्तव पडून आहेत. ते खराब असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे, तर ‘व्हेंटिलेटर्स’ पडून राहिल्यामुळे खराब झाले आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या प्रकारावरून महाराष्ट्र शासन आणि विरोधी पक्ष भाजप यांच्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप चालू आहेत.
१. सद्यःस्थितीत कोरोनामुळे फुप्फुसे निकामी झालेल्या अतीगंभीर रुग्णांना ‘व्हेंटिलेटर’द्वारे कृत्रिम ऑक्सिजन दिला जातो. तज्ञ व्यक्तींचा अभाव, ‘सॉफ्टवेअर’ची अडचण, भागांची दुरुस्ती आदी विविध कारणास्तव हे ‘व्हेंटिलेटर्स’ पडून आहेत. काही ठिकाणी तर ‘व्हेंटिलेटर्स’चे ‘इन्स्टॉलेशन’ही करण्यात आलेले नाही.
२. ‘व्हेंटिलेटर’द्वारे उपचार करतांना त्याचा ‘प्रेशर सपोर्ट’ ४५ ते ७५ पातळीपर्यंत असायला हवा; मात्र काही ‘व्हेंटिलेटर्स’चा ‘प्रेशर सपोर्ट’ २१ पातळीपर्यंत खाली आहे. त्यामुळे त्यातून ऑक्सिजनऐवजी हवाच फेकली जाते. अशा ‘व्हेंटिलेटर्स’चा उपचारासाठी काहीही उपयोग होत नाही, असे वैद्यकीय अधिकार्यांचे म्हणणे आहे.
३. सध्या नादुरुस्त असलेल्या ‘व्हेंटिलेटर्स’मध्ये अकोला येथे ४०, पुणे ७५, नाशिक ६४, बीड ९९, हिंगोली १२ आदी ठिकाणी नादुरुस्त ‘व्हेंटिलेटर्स’ आहेत. संभाजीनगर येथील २७ ‘व्हेंटिलेटर्स’ नादुरुस्त आहेत, तर ३७ ‘व्हेंटिलेटर्स’ अद्यापही ‘इन्स्टॉल’ केलेले नाहीत.
४. याविषयी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने राज्य सचिवांच्या आदेशानुसार नादुरुस्त ‘व्हेंटिलेटर्स’विषयी अहवाल सादर केला. यामध्ये ‘व्हेंटिलेटर्स’ कोरोनाच्या अतीगंभीर रुग्णांसाठी वापरता येण्याजोगे नाहीत. संबंधित आस्थापनाच्या अभियंत्यांना याविषयी माहिती देण्यात आली; मात्र ते साहाय्य न करता निघून गेले. पुन्हा येऊन त्यांनी केवळ २ ‘व्हेंटिलेटर्स’ दुरुस्त करण्यात आल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.