देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्रत्येक हिंदूने सिद्ध होण्याची आवश्यकता ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

बलोपासना, भक्ती-शक्ती ऑनलाईन संमेलनात विदर्भ, मराठवाडा, नाशिक आणि खान्देश येथील धर्मप्रेमींचा सहभाग !

सद्गुरु नंदकुमार जाधव

जळगाव – महाभारतामध्ये पांडवांनी, तर रामायणात प्रभु श्रीरामाने धर्माच्या बाजूने लढा दिला. छत्रपती शिवरायांनी पाच पातशाह्यांचा नायनाट करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यापद्धतीने प्रत्येक हिंदूने आज देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध होण्याची आवश्यकता आहे. बलोपासनेच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ मिळाले आहे. बलोपासनेचा लाभ हिंदु बांधव आणि आपले नातेवाइक यांनाही व्हावा, यादृष्टीने आपण सिद्धता करायला हवी, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ पद्धतीने झालेल्या बलोपासना, भक्ती-शक्ती संमेलनाच्या सांगता प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमात विदर्भ, मराठवाडा, नाशिक, खान्देश येथून अनेक धर्मप्रेमी ‘ऑनलाईन’ उपस्थित होते. सर्व धर्मप्रेमींनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी व्यष्टी-समष्टी साधना करण्याचा निश्‍चय केला. या कार्यक्रमाचा उद्देश श्री. श्रेयस पिसोळकर यांनी सांगितला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निखिल कदम आणि कु. शबरी देशमुख यांनी केले.

क्षणचित्रे

१. सद्गुरु जाधव यांनी ‘देव, देश आणि धर्मासाठी’ या शौर्यगीताचे गायन करून संमेलनाची सांगता केली. यातून अनेक धर्मप्रेमींची भावजागृती आणि शौर्यजागृती झाली.

२. सर्व धर्मप्रेमींनी घोषणांच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

प्रशिक्षणार्थींचे मनोगत

  • कु. उमा कदम, नंदुरबार आणि रवींद्र वारगाने, जालना – जे काही शिकलो आहे, त्याचे प्रशिक्षण इतरांना देण्याचा प्रयत्न करू !
  • कु. तनीषा बागुल, नाशिक – सकाळी वर्गाला जोडल्यानंतर ‘मी रामराज्यात आहे’, असे वाटत होते.
  • सौ. सुषमा सोनवणे – शौर्यजागृती आणि भावजागृतीही झाली.
  • कु. साक्षी दादगळ, अकोला – ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी योगदान देता यावे’, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना !
  • श्री. गणेश भोसले, वाघोदा, जळगाव – बलोपासना वर्गामुळे सकाळी लवकर उठण्याची सवय लागली आणि नामजप साधना चांगली होऊ लागली. त्यामुळे आमच्या घरातही पालट झाले.
  • सौ. नयना पटेल – बलोपासनेमुळे देवावरील श्रद्धा वाढली.