माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह १९ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट केले !

  • कर्नाळा बँक आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण 

  • संबंधितांना खुलासा करण्याची २ जून या दिवशी संधी !

  • सहकार विभागाने संचालकांकडून प्रत्येकी १६ ते २९ कोटी रुपयांची वसुली रक्कम केली निश्‍चित !

माजी आमदार विवेक पाटील

पनवेल, १९ मे (वार्ता.) – येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ५२९ कोटी ३६ लाख ५५ सहस्र २६ रुपयांच्या कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील आणि त्यांचा मुलगा अभिजित यांच्यासह १९ संचालक अन् मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उत्तरदायी धरले आहे. त्यांच्यावर आणि मृत संचालकांचे वारस यांच्यावर आरोपपत्रही प्रविष्ट करण्यात आले आहे. सहकार विभागाने प्रत्येक संचालकाकडून १६ ते २९ कोटी रुपये इतकी वसुलीची रक्कमही निश्‍चित केली आहे. यामुळे सर्व संचालकांचे धाबे दणाणले आहे.

१. अधिकोषाचे तत्कालीन संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पदाधिकारी, व्यवस्थापक यांनी केलेले बनावट कर्जवाटप, अपकार्य, विश्‍वासघात, आर्थिक अपव्यवहार यांमुळे कर्नाळा बँक अडचणीत आली. (भ्रष्टाचाराने पोखरलेल्या सहकारी संस्था ! – संपादक)

२. जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी १३ डिसेंबर २०१९ या दिवशी सादर केलेल्या विशेष लेखापरीक्षण अहवालामुळे ही गोष्ट उघडकीस आली. रिझर्व्ह बँकेने सादर केलेला अहवाल आणि पोलिसांनी प्रविष्ट केलेल्या फौजदारी कारवाईतील निष्कर्षाच्या आधारे सहकार विभागाने वेगाने कार्यवाही केली.

३. यापूर्वी संबंधितांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम ८८नुसार बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी दिलेले जबाब, दफ्तर आणि कागदपत्रांच्या छाननीनंतर महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१चे नियम ७२ नुसार हानीच्या दायित्वाची रक्कम निश्‍चित करून आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले. हानीची रक्कम आपल्यावर कायम का करण्यात येऊ नये ? तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम ८८ आणि नियम ७२ अन्वये योग्य ती पुढील कार्यवाही का करण्यात येऊ नये ? असेही संबंधितांना विचारण्यात आले आहे.

४. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१च्या नियम ७२(४)मधील तरतुदींनुसार आपल्या बचावासाठी कागदोपत्री पुराव्यासह आपले लेखी म्हणणे वा खुलासा २ जून या दिवशी सकाळी ११ वाजता ठाणे येथील उपनिबंधक कार्यालयात करण्याविषयी संधी देण्यात आली आहे.