सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा जिल्ह्यातील बागायतीला मोठा फटका बसला आहे. १७२ गावांमधील १ सहस्र ५९ शेतकर्यांच्या एकूण ३ सहस्र ३७५.१६ हेक्टर क्षेत्रावरील बागेची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हानी झालेल्या पिकांमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम आणि केळी यांचा समावेश आहे. सर्वाधिक हानी काजू बागायतींची झाली असल्याची माहिती अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक हानी देवगड तालुक्यातील बागांची झाली आहे, तर सर्वांत अल्प हानी वैभववाडी तालुक्यातील बागांची झाली आहे. मालवण तालुक्यात काजू, नारळ, सुपारी, कोकम यांच्या बागा, देवगड तालुक्यात आंब्याच्या बागा, तर दोडामार्ग तालुक्यात केळीच्या बागा यांची सर्वाधिक हानी झाली आहे.
उपरोक्त आकडेवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राथमिक स्वरूपात देण्यात आली असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच पेट्रोल, डिझेल मिळणार
सिंधुदुर्ग – तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपांवर केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच पेट्रोल आणि डिझेल यांची विक्री करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. १६ मे या दिवशी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप मालकांना याविषयीचा आदेश दिला आहे. सध्या १ जूनपर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कडक निर्बंध आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल यांचा पुरवठा न झाल्यास अत्यावश्यक सेवेला इंधनाचा तुटवडा भासू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या हानीचे त्वरित पंचनामे करण्याची मनसेची मागणी
सिंधुदुर्ग – तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या हानीचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करावेत, तसेच हानीभरपाई देण्याच्या निकषात पालट करून जनतेला त्वरित साहाय्य करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.