एप्रिल २०२१ च्या शेवटच्या आठवड्यामध्ये आयुष मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये मंत्रालयाच्या पुढाकाराने आणि संशोधनाने निर्माण करण्यात आलेल्या ‘आयुष ६४’ नामक या आयुर्वेदाच्या औषधाने सौम्य अन् मध्यम लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांना लाभ होत असल्याचे संशोधनांती घोषित केले. निष्कर्ष काढण्याकरता केले जाणारे संशोधन अनुमाने गेले १ वर्ष देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी चालू होते. याचा तपशील ‘क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया’ या संकेतस्थळावरही उपलब्ध होता. यासोबतच अन्य वेगवेगळ्या ठिकाणी आयुर्वेदाच्या औषधांच्या कोविडमध्ये होणार्या प्रभावी वापराविषयी विविध संशोधनही चालू होते. यातील काहींचे निष्कर्ष आले आहेत, तर काहींचे येणार्या काही काळामध्ये येतील. आयुर्वेदाने वैज्ञानिकता आणि आधुनिक काळाच्या कसोट्यांवर खरे उतरावे, अशी मते वारंवार मांडली जात असतात; मात्र तसे करत असतांना स्वतः मंत्रालयाच्या पुढाकाराने आलेल्या निष्कर्षांची समाजमाध्यमांवर यथेच्छ गळचेपी होण्याचे दृश्य होते. समाजातील वेगवेगळ्या मान्यवरांनी ज्या वेळी दूरदर्शन वा ‘ए.एन्.आय.’सारख्या विश्वासू स्रोतांकडून याविषयी आलेल्या बातम्या समाजमाध्यमांवर सामायिक केल्या, त्या वेळी फेसबूकसारख्या समाजमाध्यमाने ‘खोट्या बातम्या प्रसारित केल्यासाठी’ या खात्यांवर २४ घंट्यांची बंदी घातली. याचसमवेत कित्येक जणांच्या अशा ‘पोस्ट’ (लिखाण) थेट उडवून (डिलीट) लावल्या. एकीकडे आयुर्वेदात कामच होत नाही, असे बोलत रहावे आणि दुसरीकडे झालेले काम जनतेसमोर ठेवण्यास बंदी घालावी म्हणजे आई जेवायला देईना आणि बाप भीक मागू देईना अशी स्थिती !
कोरोनावर करण्यात आलेल्या आयुर्वेदाच्या ३ वैद्यकीय चाचण्या
अ. जयपूरमध्ये कोरोना रुग्णांवर आयुर्वेदाच्या उपचारांमुळे दिसून आलेली तफावत : गेल्या वर्षभरामध्ये भारतात कोविड आणि आयुर्वेद यांविषयी ३ ज्ञात अत्यंत उत्तम प्रकारचे ‘क्लिनिकल ट्रायल्स’ (वैद्यकीय चाचण्या) झाल्या आहेत. यांपैकी जयपूरमध्ये केलेल्या ट्रायलमध्ये १०० रुग्णांवर औषधे देतांना असा निष्कर्ष नोंदला गेला की, आयुर्वेदाचे उपचार घेणार्या गटातील ७१.२ टक्के रुग्ण उपचाराच्या तिसर्या दिवशी बरे होतांना दिसून आले. तसेच ‘प्लासिबो’ गटांमध्ये हा आकडा ५० टक्के इतका होता. ७ दिवसांत आयुर्वेद उपचार गटामध्ये १०० टक्के रुग्ण बरे झाले, तर ‘क्लासिक प्लासिबो’मध्ये हा आकडा ६० टक्के असा होता. आयुर्वेद उपचार घेणार्या गटांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका ४० टक्क्यांनी न्यून झालेला दिसून आला.
(संदर्भ : गणपत देवपुरा आणि अन्य, ‘फायटोमेडिसिन’)
आ. पुण्यामध्ये कोरोना रुग्णांवर पाश्चात्त्य औषधांसह आयुर्वेद उपचार केल्यानंतर लक्षात आलेली तफावत : पुण्यातील एका कोविड सेंटरमध्ये ९९ रुग्णांवर परीक्षण केले गेले असता त्यातील ६० रुग्णांना पाश्चात्त्य औषधांसह आयुर्वेद उपचार देण्यात आले, तर ३९ रुग्णांवर केवळ पाश्चात्त्य औषधांचा उपयोग करण्यात आला. या दोन्ही गटांमध्ये तुलना केली असता ज्यांना आयुर्वेदाचे उपचार देण्यात आले, त्या गटातील रुग्णांमध्ये तुलनेत अधिक जलद गतीने सुधारणा दिसून आली. या गटातील रुग्णांचा रुग्णालयात रहाण्याचा कालावधी न्यून झालेला दिसून आला. आयुर्वेदाचे उपचार देण्यात आलेल्या गटांमध्ये श्वसन संस्थेच्या लक्षणांमध्ये पहिल्या, तिसर्या आणि सातव्या दिवशी अनुक्रमे ५३ टक्के, १६ टक्के आणि १.६ टक्के इतका झपाट्याने घटणारा सहभाग दिसला, तर आयुर्वेदाचे उपचार न देण्यात आलेल्या गटांमध्ये या ३ दिवसांच्या कालावधीमध्ये ही लक्षणे ४६ टक्के, ३८ टक्के आणि २८ टक्के दिसून आली. याचा अर्थ आधुनिक उपचारांसह आयुर्वेदाचे उपचार दिले जात असता लक्षणीय तफावत झालेली दिसून आली.
(संदर्भ : पंकज वांजरखेडकर आणि अन्य, ‘जर्नल ऑफ आयुर्वेद अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन’, १९ ऑक्टोबर २०२०)
इ. लक्ष्मणपुरीमध्ये करण्यात आलेल्या उपचारांमध्ये विषाणू वाढण्याच्या वेगात घट आढळणे : लक्ष्मणपुरीमध्ये (लखनौमध्ये) झालेल्या आणखी एका ‘क्लिनिकल ट्रायल’मध्ये १२० संसर्ग झालेले रुग्ण सहभागी होते. ज्यांची विभागणी ३ समूहात केली गेली. तिन्ही गटांची उपचाराच्या पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी ‘आर्.टी.-पी.सी.आर्.’ चाचणी करण्यात आली. यातील ज्या गटाला आयुर्वेदाचे उपचार देण्यात आले होते, त्या गटात इतरांच्या तुलनेत लवकर संसर्गापासून सुटका मिळण्याचे प्रमाण अधिक आढळले. तसेच त्यांच्यात लाक्षणिक सुधारणा, तसेच विषाणू वाढण्याच्या वेगात घटही झालेली आढळून आली.
(आदिल रईस आणि अन्य, ‘जर्नल ऑफ आयुर्वेद अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन’, २ फेब्रुवारी २०२१)
पाश्चात्त्य औषधांसह आयुर्वेदाचे उपचार घेतल्याने लक्षणीय लाभ होणे
वरील ३ ‘क्लिनिकल ट्रायल’सहच अनुमाने ६ विविध ‘क्लिनिकल स्टडीज्’ही आतापर्यंत प्रकाशित झाल्या आहेत. याव्यतिरिक्त विविध प्रकारची षड्यंत्रे करून ‘आयुर्वेदाचे काम जगाच्या समोर येऊच नये’, असा एका विशिष्ट लॉबीचा आग्रह असल्यामुळे आमच्यासारख्या कित्येक वैद्यांचे ‘केस रिपोर्ट’ (चिकित्सेचा अहवाल) ही कायद्याची कारणे पुढे करत नाकारण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडलेले आहेत. आसेतुहिमाचल शुद्ध आयुर्वेदाचे चिकित्सक कोविडच्या जवळपास सर्वच अवस्थांमध्ये रुग्णांना औषधोपचार देत आहेत. लक्षणीय संख्येत केवळ आयुर्वेदाच्या उपचारांनी अन्यथा अगदी रुग्णालयात भरती झालेल्या आणि कृत्रिम ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांना पाश्चात्त्य उपचारांसह आयुर्वेदाचे उपचार घेतल्याने लाभ झाल्याची असंख्य उदाहरणे आज आहेत. अशा उदाहरणांना ‘प्रॅक्टिस बेस्ड एव्हिडन्स’ (सरावांवर आधारित पुरावा) असे म्हटले जाते.
युद्धजन्य काळात कोणत्याही चिकित्साशास्त्राचा दुराग्रह करण्याऐवजी त्यांचे साहाय्य घेणे आवश्यक !
वैश्विक संसर्गाच्या युद्धजन्य काळात या प्रकारच्या अभ्यासालाही मोलाचे महत्त्व असते. ‘आयुर्वेदात संशोधने होत नाहीत’, असे सातत्याने सांगत समाजाची दिशाभूल करणारे लोक या प्रमाण संशोधनाविषयी अवाक्षरही काढतांना आपल्याला दिसणार नाहीत. दुसरीकडे आज प्रस्थापित पाश्चात्त्य वैद्यकाकडेही या रोगाकरता कोणताही सुनिश्चित उपाय नाही. असे असतांना जगातील जे कोणतेही चिकित्साशास्त्र साहाय्याचा हात देऊ शकत असेल, तर त्यांच्याकडून ते साहाय्य घेणे, हे मानवतेच्या दृष्टीने सर्वार्थाने महत्त्वाचे असेल; मात्र आपल्या उत्पादनांच्या विक्रीवर रुग्णांच्या आरोग्यापेक्षा ज्यांचे अधिक लक्ष असते, अशा गटातील लोक जाणीवपूर्वक हे सत्य दाबण्याचा प्रयत्न करत रहातात !
अशा वेळी लोकांनी स्वतः सजगपणे आपले पर्याय निवडणे महत्त्वाचे असते. इथे कोणत्याही चिकित्साशास्त्राचा दुराग्रह उपयोगाचा नाही. जिथे शक्य आहे तिथे स्वतंत्रपणे आणि जिथे आवश्यकता पडेल तिथे अन्य चिकित्साशास्त्रांच्या साहाय्याने मानवतेचे हित साधण्याचे अंतिमतः ध्येय ठेवून चालणे अत्यावश्यक असते. या लेखाच्या निमित्ताने सूज्ञ वाचकांना हे आवर्जून सांगू इच्छितो की, कोविड असो वा अन्य कुठलाही रोग असो आपल्यासमोरचे उपचाराचे सर्व पर्याय खुले ठेवा. गेल्या वर्षभराच्या प्रत्यक्ष चिकित्सा अनुभवानंतर हे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, कोविडच्या रुग्णांत स्वतंत्रपणे वा प्रस्थापित ॲलोपॅथीच्या उपचारांसह जितक्या लवकर आयुर्वेदाचे उपचार चालू करतो, तितका त्याला अधिक चांगला आणि दीर्घकालीन लाभ मिळण्याची शक्यता बळावते. आम्ही जे अनुभवत आहोत, ते सांगत आहोत. अंतिम निर्णय तुमचा आहे.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली, ठाणे