राज्यातील किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली दुर्गप्रेमींसमवेत बैठक !

५ किल्ल्यांची निवड करून प्रत्येक किल्ल्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि इतिहासाची साक्ष देणार्‍या महाराष्ट्रातील किल्ल्यांचे जतन अन् संवर्धन व्हावे, यासाठी १५ मे या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्गप्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत ‘ऑनलाईन’ बैठक घेतली. राज्यातील ५ किल्ल्यांची निवड करून प्रत्येक किल्ल्याच्या जतन आणि संवर्धन यांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले. या कामाचे नियंत्रण मुख्यमंत्री सचिवालयाद्वारे केले जाईल.

बैठकीला पर्यटन विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, भारतीय पुरातत्व खाते, महाराष्ट्र पुरातत्व खाते यांचे अधिकारी, गिर्यारोहक संघटनांचे प्रतिनिधी, तसेच सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, दुर्गप्रेमी मिलिंद गुणाजी, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे हे उपस्थित होते.

पावित्र्य आणि ऐतिहासिक वारशाला धक्का न लावता गडकिल्ल्यांचे संवर्धन करावे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकेकाळचे सोबती आणि स्वराज्याचे सैनिक असलेल्या गडकिल्ल्यांनी महाराजांचा पराक्रम पाहिला आहे. त्या पराक्रमाचे ते साक्षीदार झाले. त्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करणे, हे आपले कर्तव्य आहे. हे करतांना गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्व वारशाला कोणताही धक्का न लावता किल्ल्यांच्या पायथा परिसरात सुविधा निर्माण कराव्यात, असे या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘किल्ल्यांच्या आजूबाजूच्या ५० किलोमीटर अंतरामध्ये असलेली पर्यटनस्थळे, किल्ल्याचे ऐतिहासिक संदर्भ, तेथील पराक्रम, वन्यजीव, वनसंपदा, जैव विविधता जोपासावी. आजूबाजूची लोकपरंपरा, गडाच्या अनुषंगाने काही लढाया झाल्या असतील, तर त्या, अशा सगळ्या गोष्टींची माहिती संकलित करून गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात पर्यटनकेंद्र विकसित करता येईल का ? मूळ गडाची प्रतिकृती सिद्ध करता येईल का ? पूर्वीचे ऐतिहासिक वातावरण निर्माण करता येईल का ? ‘लाईट अ‍ॅड साऊंड शो’ दाखवता येईल का ? यादृष्टीने विचार करून एक सर्वंकष विकास आराखडा या समित्यांनी सादर करावा. राज्यातील सर्व किल्ले एका शासकीय विभागाच्या अंतर्गत आणून त्यांच्या विकासात असलेले अडथळे त्वरित दूर करा. गड-किल्ल्यांवरील स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. गडकिल्ल्यांचा विकास करतांना त्याचे ऐतिहासिक संदर्भ जपले जाणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे किल्ल्यांची डागडुजी ही पुरातत्व खात्याच्या निकषांप्रमाणे होणे आवश्यक आहे.’’