नातेवाईक घायाळ
हिंगोली – येथील शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णास भेटण्यासाठी गेलेल्या रुग्णाचे नातेवाईक वैभव सरकटे (वय ३० वर्षे) यांनी रुग्णालयात जिल्हाधिकारी येताच ‘ते आपल्याला विलगीकरण कक्षात पाठवतील’, या भीतीने थेट रुग्णालयाच्या तिसर्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत ते घायाळ झाले असून त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार चालू आहेत. ही घटना १३ मे या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता घडली.
शासकीय रुग्णालयाच्या कोविड प्रभागात रुग्णांसमवेत थांबणार्या नातेवाइकांची गर्दी होऊ लागली होती. रुग्णांचे नातेवाईक दिवसभर रुग्णासमवेत थांबून रात्री घरी जाऊ लागले होते. त्यामुळे हे नातेवाईकच कोरोनाचा प्रसार करू लागले होते. त्यांना आवर घालण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी रुग्णांच्या नातेवाइकांना कोविड प्रभागात थांबण्यास बंदी केली आहे.
त्यांनी रुग्णालयाला अचानक भेट दिली. त्या वेळी आढळून आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना थेट लिंबाळा येथील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. त्यानंतर कोविड प्रभागाच्या खाली पोलीस बंदोबस्त वाढवला, तसेच ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी यांच्या नियुक्त्या करून रुग्णालयाच्या परिसरात फिरणार्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.