कोल्हापूर – सौम्य लक्षणांचे कोरोना रुग्ण ‘होम आयसोलेशन’ (गृह विलगीकरण) कालावधीत बाहेर फिरतात. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या रुग्णांना ‘संस्थात्मक विलगीकरणा’त ठेवावे, अशी सूचना ‘टास्क फोर्स’ने केली आहेे. शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ‘टास्क फोर्स’ सध्या विविध ठिकाणी भेटी देऊन सूचना करत आहे.
कोरोनाबाधितांवर खासगी रुग्णालयात काही दिवस उपचार होतात. पुढे तो रुग्ण गंभीर झाल्यावर त्याला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात पाठवले जाते. पुन्हा अत्यवस्थ झाल्यानंतर त्याचे इतरत्र स्थलांतर केले जाते. स्थलांतराच्या वेळी रुग्णाची ऑक्सिजनची पातळी खालावते. रुग्ण अतीगंभीर होऊन त्याचा मृत्यू होत आहे, असे निरीक्षण ‘टास्क फोर्स’ने केले आहे.