सातारा, १३ मे (वार्ता.) – कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेमध्ये बालकांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. गत २ मासांत जिल्ह्यात ३ सहस्रांहून अधिक बालके कोरोनाबाधित झाली आहेत. त्यातही केवळ एप्रिल मासात २ सहस्र ६०२ बालके कोरोनाबाधित झाली आहेत.
जिल्ह्यात मार्च मासापासून कोरोनाची दुसरी लाट चालू झाली आहे. प्रतिदिन कोरोनामुळे सरासरी २ सहस्रांहून अधिक व्यक्ती बाधित होत आहेत. त्यातही एकाच कुटुंबातील अनेक व्यक्ती बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे. गतवर्षी बालकांना कोरोना होण्याचे प्रमाण अल्प होते; मात्र यावर्षी ते अधिक आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत मार्च मासात ४१८, तर एप्रिल मासात २ सहस्र ६०२ बालके बाधित झाली आहेत. मार्च २०२० पासून ते मार्च २०२१ या एका वर्षाच्या कालावधीत ८ सहस्र ५८५ बालके बाधित झाली आहेत. बालकांसाठी वेगळे कोरोना (सेंटर) रुग्णालय नसल्यामुळे अन्य कोरोनाबाधितांसमवेतच त्यांच्यावर उपचार करावे लागत आहेत. जिल्हा रुग्णालयात केवळ २० खाटांची व्यवस्था करण्यात आली ऊसन ती अपुरीच आहे. तसेच खासगी रुग्णालयातही कोणतीही वेगळी व्यवस्था नाही.