सातारा, १२ मे (वार्ता.) – पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रणी पतसंस्था म्हणून कराड (जिल्हा सातारा) येथील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था सुपरिचित आहे. कोरोनाकाळात जनकल्याण पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपत ‘पंतप्रधान आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधी’ला प्रत्येकी ५ लाख रुपये, असे एकूण १० लाख रुपये दिले आहेत.
जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर, संचालक शिरीष गोडबोले, डॉ. प्रकाश सप्रे, जितेंद्र शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा धनादेश उपनिबंधक मनोहर माळी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
वर्ष २०२० मध्येही जनकल्याण पतसंस्थेने ‘पंतप्रधान आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधी’ला १० लाख रुपये अर्थसाहाय्य दिले होते. तसेच कोरोना योद्ध्यांना न्याहरी, भोजन, मास्क, सॅनिटायझर, हॅण्डग्लोज यांचेही वाटप केले आहे. उपनिबंधक मनोहर माळी यांनी संस्थेच्या पदाधिकार्यांचे आभार मानत संस्थेने ५०२ कोटी रुपयांच्या ठेवी आणि ३०८ कोटी रुपयांच्या कर्जासह ८१० कोटींचा व्यवसाय पूर्ण केल्याविषयी कौतुक केले.