गोमेकॉतील ऑक्सिजनच्या तुटवड्याविषयी उच्च न्यायालयामार्फत अन्वेषण करा ! – विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री
पणजी, ११ मे (वार्ता.) – गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉत) १० मेच्या रात्री २ ते सकाळी ६ या वेळेत २८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात १ सहस्र २०० ऑक्सिजन सिलिंडरची मागणी आहे; मात्र महाविद्यालयाला केवळ ४०० सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला आहे. १० मेच्या रात्री २८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झाला आहे. रात्री २ ते सकाळी ६ या वेळेत झालेल्या मृत्यूंचे उच्च न्यायालयामार्फत अन्वेषण करावे, अशी मागणी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केली आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पुढे प्रश्न केला की, गोवा शासनाने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेमलेेले तीन ‘नोडल’ अधिकारी काय काम करत आहेत ? (आवश्यक तेवढ्या सुविधा आहेत कि नाहीत, हे पहाण्याचे दायित्व कुणाचे ? रात्री २ ते सकाळी ६ या वेळेत ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू होत असतील आणि रुग्णालयात आवश्यक तेवढा ऑक्सिजनचा साठा नसेल, तर त्याला कोण उत्तरदायी ? सर्वांवरच कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)
गैरव्यवस्थापनामुळे गोमेकॉत ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
गोमेकॉत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या वाढत्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ११ मे या दिवशी सकाळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन तेथील ऑक्सिजन पुरवठ्याविषयी स्थिती जाणून घेतली. यानंतर पत्रकारांंना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘‘गोमेकॉत ऑक्सिजनच्या अपुर्या पुरवठ्यास गैरव्यवस्थापन कारणीभूत आहे. वॉर्डमध्ये ऑक्सिजन सिलिंडर वेळेत पोचत नाही; मात्र गोमेकॉला ऑक्सिजनचा तुटवडा नाही. मी आज प्रथमच वॉर्डला भेट दिली आणि वॉर्डमध्ये डॉक्टर, त्यांना साहाय्य करणारे कर्मचारी आणि रुग्ण यांच्याकडून वस्तूस्थिती जाणून घेतली. वॉर्डमध्ये ऑक्सिजन सिलिंडर वेळेत पोचण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. मी आता १२ मेपर्यंत प्रत्येक वॉर्डानुसार ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी अधिकारी नेमून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करणार आहे.’’ (मुख्यमंत्र्यांना हे करावे लागत असेल, तर तेथील व्यवस्थापन पहाणारे काय करत आहेत ? त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी ! – संपादक) प्राप्त माहितीनुसार काही रुग्णांचे नातेवाईक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना म्हणाले, ‘‘कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सिजनच्या अभावी मरत आहेत. रुग्ण सकाळी चांगले असतात; पण ते केवळ रात्री ऑक्सिजनच्या अभावी मरतात.’’
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून आरोग्य खाते काढून घ्या ! – बाबूश मोन्सेरात, आमदार
पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी गोव्यातील विविध रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना उत्तरदायी ठरवले आहे. आमदार बाबूश मोन्सेरात म्हणाले, ‘‘कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमुळे गोमंतकियांना होत असलेले दु:ख मला पहावत नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विश्वजीत राणे यांच्याकडून आरोग्य खाते काढून घ्यावे. आरोग्य खाते हाताळण्यात विश्वजीत राणे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात होत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे सीबीआयमार्फत अन्वेषण करावे.’’
गोमेकॉतील ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांची विसंगत विधाने अन् मतभेद चव्हाट्यावर !
गोव्यातील प्रथितयश रुग्णालय म्हणून गणल्या गेलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील दुःस्थिती आता पूर्ण नियंत्रणाबाहेर गेली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रतिदिन २० ते ३० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे आणि गेले काही दिवस ही स्थिती दिसून येत आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयावरून मुख्यंमत्री आणि आरोग्यमंत्री विसंगत विधाने करत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणतात, ‘‘गोमेकॉला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत आहे; मात्र गैरव्यवस्थापनामुळे ऑक्सिजनचे सिलिंडर वेळेत वॉर्डात पोचत नाहीत’’, तर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे महाविद्यालयात गैरव्यवस्थापन होत असल्याचे मान्य न करता महाविद्यालयात ऑक्सिजनचा तीव्र तुटवडा भासत असल्याचे सांगतात. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणतात, ‘‘मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कुणीतरी चुकीची माहिती पुरवली आहे आणि यामुळे ते महाविद्यालयातील व्यवस्थापनाला दोष देत आहेत.’’