उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. देवश्री जड्यार ही आहे !
१. श्री. दयानंद जड्यार (कु. देवश्रीचे वडील)
१ अ. सकाळपासूनच उत्साह जाणवणे आणि ‘कु. देवश्रीची आध्यात्मिक पातळी घोषित होईल’, असा विचार मनात येणे : ‘२.७.२०२० या दिवशी सकाळी उठल्यापासून मला अतिशय उत्साह जाणवत होता. माझ्याकडून प्रार्थना आणि कृतज्ञता सहजतेने होत होती. कामावर असतांनाही मला अतिशय उत्साह जाणवत होता आणि माझी भावजागृती होत होती. १२ घंटे काम करूनही घरी आल्यावर मला थकवा जाणवत नव्हता. घरातील वातावरण अतिशय प्रसन्न वाटत होते. ‘कु. देवश्रीची आध्यात्मिक पातळी घोषित होईल’, असा विचार माझ्या मनात येऊन गेला.
१ आ. उत्तरदायी साधकांनी कु. देवश्रीची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असल्याचे घोषित केल्यावर घरातील सर्वांची भावजागृती होणे आणि घरातील वातावरणात पालट होऊन पुष्कळ चैतन्य जाणवणे : रात्री ८ वाजता बोईसर केंद्रातील साधकांचा ‘ऑनलाईन’ सत्संग होता. तेव्हा उत्तरदायी साधकांनी कु. देवश्रीला ‘गुरुपौर्णिमेसाठी काय प्रयत्न करणार ?’, असे विचारल्यावर ती ध्यानावस्थेत गेली होती; परंतु ‘ती झोपली आहे’, असे आम्हाला वाटले. तिला हाक मारल्यावर तिने ‘कोणते प्रयत्न करणार ?’, हे सांगितले. तिचे प्रयत्न ऐकून सर्व साधकांची भावजागृती झाली. त्या वेळी उत्तरदायी साधकांनी कु. देवश्रीची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असल्याचे घोषित केले. तेव्हा घरातील सर्वांची भावजागृती झाली आणि त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू आले. देवश्रीचाही भाव जागृत झाला आणि तिच्या डोळ्यांतूनही आनंदाश्रू आले. गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त झाली. या वेळी घरातील वातावरणात पालट झाला होता आणि पुष्कळ चैतन्य जाणवत होते.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी देवश्रीसारखे दैवी बाळ देऊन तिच्याकडून शिकण्याची संधी दिली’, याविषयी त्यांच्या चरणी कृतज्ञता ! ‘तिची पुढील आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी आपणच त्या दृष्टीने तुम्हाला अपेक्षित असे प्रयत्न तिच्याकडून करवून घ्या’, अशी गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आणि कोटीशः कृतज्ञता !’
२. सौ. प्रीती जड्यार (कु. देवश्रीची आई)
२ अ. कु. देवश्रीची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या २ दिवस आधीपासून तिच्या वागण्यात वेगळेपणा जाणवणे अन् तिचा तोंडवळा सात्त्विक अन् तेजस्वी जाणवणे : ‘कु. देवश्रीची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या २ दिवस आधीपासून तिच्या वागण्यात वेगळेपणा जाणवत होता. तिचा तोंडवळा सात्त्विक आणि तेजस्वी जाणवत होता. तिची आध्यात्मिक पातळी घोषित झाली, तरी ती निर्विचार स्थितीत होती.’
कु. देवश्री दयानंद जड्यार हिची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. सौ. सुशीला होनमोरे, बोईसर
अ. ‘कु. देवश्रीचा स्वभाव शांत आहे आणि ती नेहमी समजूतदारपणे वागते.
आ. तिच्या आई-वडिलांना व्यष्टी साधनेच्या आढाव्यात काही अडचण आली, तर ती त्यांना साहाय्य करते.
इ. तिला सत्संगात ‘अपेक्षा करणे’ या स्वभावदोषाची व्याप्ती काढायला सांगितली होती. तिने अत्यंत बारकाईने व्याप्ती काढली होती.
ई. देवश्रीला शाळेत कोणतेही पारितोषिक मिळाले, तरी ती गुरुचरणी अर्पण करते.
उ. देवश्रीला देवतांची चित्रे काढायला अतिशय आवडतात. ती देवांची सुंदर चित्रे काढते. एकदा तिने महाशिवरात्रीला फलकावर शिवलिंगाचे चित्र काढले होते. ते पाहून भावजागृती होत होती.
ऊ. हिंदु जनजागृती समितीचे फलक प्रसिद्धीसाठी येणारे लिखाण ती फलकावर सुंदर अक्षरात लिहिते.
ए. तिला आश्रमात जाण्याची ओढ आहे.’
२. सौ. कल्पना कार्येकर, मुंबई
२ अ. दिवसभरातील वेळेचे नियोजन करून कृती करणे : ‘एकदा मी देवश्रीच्या घरी गेले होते. देवश्रीने तिच्या दिवसभरातील वेळेचे नियोजन केले होते. ते वेळापत्रक तिने मला दाखवले. त्यात तिने ‘सकाळी उठणे, खेळणे, अभ्यास करणे, आईला साहाय्य करणे, रात्री झोपणे’ या सर्वांचे नियोजन लिहिले होते. ‘ती एवढ्या लहान वयात नियोजना प्रमाणे कृती करण्याचे प्रयत्न करते’, हे पाहून मला तिचे कौतुक वाटले.
२ आ. प्रत्येक कृती सात्त्विक वाटणे : तिचे बोलणे, चालणे आणि तिची प्रत्येक कृती पुष्कळ सात्त्विक वाटत होती. ‘तिच्याशी बोलतच रहावे’, असे वाटत होते.
२ इ. भाव : तिने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ व्यवस्थित ठेवला होती आणि त्यांच्या प्रतिमेची पूजा केली होती. ‘ती नियमित अशी पूजा करते’, असे तिच्या आईने सांगितले.
२ ई. तिने ‘मला अध्यात्मात पुष्कळ प्रगती करायची आहे’, असे सांगितले. तिचे हे विचार ऐकून मला स्फूर्ती मिळाली आणि माझ्याकडून आपोआप ‘तिची इच्छा पूर्ण होऊ दे’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना झाली.’
यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक