उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. वेद निखिल कडूकर हा या पिढीतील एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
चि. वेद निखील कडूकर (वय २ वर्षे) याच्याविषयी त्याचे आई-वडील आणि आजी-आजोबा यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. गर्भारपणात केलेली साधना
‘मी गरोदर असतांना नामजप करणे, प्रतिदिन मारुतिस्तोत्र ऐकणे, ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकणे, ध्यान आणि योगासने करणे, या सर्व कृती करत होते. मी मारुतिस्तोत्र ऐकत असतांना मला बाळाच्या हालचाली जाणवत होत्या. मी बाळासाठी स्वयंसूचना देत होते, ‘माझे बाळ दिव्य चैतन्यशक्ती आहे. ते बुद्धीमान, सर्वगुणसंपन्न आणि शांत आहे.’ – सौ. स्वप्नाली कडूकर (चि. वेदची आई), गडहिंग्लज, कोल्हापूर
२. जन्म ते १ वर्ष
अ. ‘बाळाच्या जन्मानंतर त्याच्या तोंडवळ्यावर तेज जाणवत होते.’ – सौ. संगीता कडूकर (चि. वेदची आजी, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५२ वर्षे), गडहिंग्लज, कोल्हापूर.
आ. ‘बाळाच्या जन्मापासूनच मला बाळाच्या चेहर्यावर पुष्कळ तेज, प्रसन्नता आणि समाधान जाणवत होते.’ – सौ. स्वप्नाली कडूकर
इ. ‘त्याला रुग्णालयात ज्या खोलीत ठेवले होते, त्या खोलीत आम्ही भ्रमणभाषवर अखंड नामजप चालू ठेवला होता. तो रात्री रडत असतांना आम्ही भ्रमणभाषवर मारुतिस्तोत्र लावल्यावर तो शांत झोपला.’ – सौ. स्वप्नाली कडूकर
ई. ‘त्याचे बाबा त्याला ‘हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे’ हे गाणे म्हणून दाखवतात. तेव्हा या गाण्यातील ‘पराक्रम’ आणि ‘माधव’ या २ शब्दांना तो हसून प्रतिसाद देत असे.’
२ उ. देवाची ओढ
१. ‘मी गायत्री मंत्र म्हटल्यावर तो रडायचा थांबतो आणि शांतपणे गायत्री मंत्र ऐकतो.’ – सौ. स्वप्नाली कडूकर
२. ‘तो ‘ज्योतसे ज्योत जगाओ’ ही आरती लावल्यानंतरच झोपत असे.
३. त्याला देवघरासमोर नेले की, तो लगेच टाळ्या वाजवतो.
४. त्याला जेवणाचा घास भरवण्यापूर्वी ‘वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।’ हा श्लोक म्हटल्यावर तो लगेच जेवतो. त्याला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप ऐकायला आवडतो.’
– सौ. संगीता कडूकर
५. ‘मी नामजप करत असतांना किंवा भ्रमणभाषवर मोठ्याने स्तोत्र लावल्यानंतर वेद अत्यंत शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न करत असे. त्या वेळी त्याची दृष्टी आवाजाच्या दिशेने असायची. त्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी जयघोष किंवा श्लोक म्हटल्यानंतर तो स्तोत्र पूर्ण होईपर्यंत कोणतीही हालचाल करत नसे.’
– डॉ. बाबूराव कडूकर (चि. वेदचे आजोबा), कोल्हापूर
२ ऊ. सात्त्विकतेची आवड
१. ‘मी ‘ऑनलाईन सत्संग’ ऐकत असतांना वेद सत्संग ऐकण्यासाठी माझ्या मांडीवर येऊन बसत असे.
२. आमच्या घरी कुणी साधक आल्यास तो साधकांकडे सहजतेने जात असे.
३. त्याला घरामध्ये लावलेला सनातनचा आकाशकंदिल पहायला आवडत असे.
४. त्याला कुंकवाचा टिळा लावायला अतिशय आवडतो.
३. वय १ ते २ वर्षे
३ अ. देव आणि वडीलधारी मंडळी यांना डोके टेकवून नमस्कार करणे : श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी गणपतीची आरती झाल्यानंतर त्याने देवाला आणि सर्व वडीलधार्या मंडळींना वाकून नमस्कार केला. दसर्याच्या दिवशी तो पुणे येथे असतांना त्याला भ्रमणभाषवरून घरातील देवाचे आणि घटाचे दर्शन करवले. तेव्हा तो भ्रमणभाषसमोर नतमस्तक झाला.
३ आ. तो त्याच्या आजोबांना नामजपादी उपायांची आठवण करून देतो.
३ इ. आम्ही सायंकाळी ‘शुभंकरोति’ म्हणत असतांना आम्ही एक ओळ म्हटल्यावर लगेच तो पुढची एक ओळ म्हणतो.
३ ई. आनंदी आणि शांत : आता तो अधिक आनंदी जाणवतो. त्याच्याकडे पाहिले की, मनाला शांत वाटते.’
४. स्वभावदोष : हट्टीपणा’
– सौ. संगीता कडूकर, गडहिंग्लज, कोल्हापूर.
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २०.१०.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.