उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. आनंदी अमोल शिंदे ही या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०२१ मध्ये ‘कु. आनंदी अमोल शिंदे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५८ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (८.१२.२०२४) |
जळगाव येथील कु. आनंदी अमोल शिंदे (आध्यात्मिक पातळी ५८ टक्के, वय ७ वर्षे) हिची तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. निरीक्षण करून अयोग्य कृती थांबवणे
‘एकदा मी माहेरी गेले होते. तेव्हा माझ्या मावशीने मला जेवणाचे आमंत्रण देण्यासाठी भ्रमणभाष केला. तेव्हा मावशी मला म्हणाली, ‘‘तुमच्यासाठी जेवायला मांसाहार बनवते.’’ ते आनंदीने ऐकल्यावर ती मावशीला म्हणाली, ‘‘मांसाहार करणे पाप आहे; कारण आपण कोणाचा तरी जीव खात असतो. आम्हाला पोळीभाजीचे जेवण करा.’’
२. प्रेमभाव
एकदा मला बरे वाटत नव्हते. कु. आनंदी शाळेतून आल्यावर तिने मला झोपलेले पाहून विचारले, ‘‘तू का झोपली आहेस ?’’ मला ताप आल्याचे कळल्यावर तिने लगेच मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या माझ्या कपाळावर ठेवल्या. ती मला म्हणाली, ‘‘आई आता बरे वाटत आहे का ?’’
३. देवाची आवड
आनंदीला गणपतीची मूर्ती बनवण्याची पुष्कळ आवड आहे. ती सतत गणपतीची मूर्ती बनवत असते. त्याला पाटावर बसवून त्याची पूजा करते, आरती म्हणते आणि त्याला नैवेद्य दाखवते. ती सर्वांना गणपतीचा प्रसाद देते.
४. नामजप करणे
ती शाळेत जातांना गणपतीचा नामजप करते, तसेच शाळेत गेल्यावर अभ्यास चालू करण्यापूर्वी गणपतीला प्रार्थना करून नामजप करते.
५. बालसंस्कारवर्गाला मुले आली नसतांना मुलांना बोलावून आणणे
एके दिवशी बालसंस्कारवर्गाला मुले आली नव्हती. तेव्हा मी आनंदीला म्हणाले, ‘‘आज मुले आली नाहीत, तर वर्ग होणार नाही.’’ तेव्हा आनंदीने आमच्या वसाहतीतील ४ – ५ मुलांना बोलावून आणले आणि मला वर्ग घ्यायला लावला.
६. धर्माचरणाच्या कृती
आनंदीच्या मावशीचा मुलगा त्याच्या आई-वडिलांना ‘मम्मी-पप्पा’ म्हणत असे. तेव्हा आनंदीने त्याला ‘आई-बाबा म्हण’ असे सांगितले. आनंदीने तिच्या वाढदिवसानिमित्त रामरक्षा ग्रंथ वाटले.
७. गुरूंप्रति भाव
परम पूज्य गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) वाढदिवसाच्या दिवशी वसाहतीतील काही मुलांना बोलावले आणि दिंडी काढली. त्या दिंडीत माझ्या दोन्ही मुलींनी त्या मुलांना ‘घोषणा कशा द्यायच्या ?’, याविषयी सांगितले. मुलींनी घोषणा दिल्यावर त्यांच्या मागे अन्य मुले घोषणा देत होती. एकदा आम्ही जळगाव सेवाकेंद्रात गेलो होतो. तेव्हा तिथे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आल्या होत्या. त्यांना पाहिल्यावर आनंदी म्हणाली, ‘‘या महालक्ष्मी आहेत.’’ तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी तिला जवळ घेतले आणि डोक्यावरून हात फिरवून खाऊ दिला.
स्वभावदोष : चिडचिडेपणा, दिखाऊपणा.’
– सौ. अवनी अमोल शिंदे (आनंदीची आई), जळगाव (८.१०.२०२४)