चुकांविषयी गांभीर्य आणि स्वतःला पालटण्याची तळमळ असणारी ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कल्याण (जिल्हा ठाणे) येथील कु. स्वरा सुधीर महाडिक (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अभीर जयेश दांगट आणि कु. स्वरा सुधीर महाडिक हे आहेत !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. स्वरा महाडिक

१. प.पू. गुरुदेव आणि श्री दुर्गादेवी यांच्याप्रतीचा भाव

१ अ. ‘जुलै २०१९ मध्ये मी रामनाथी आश्रमात जातांना माझ्या कन्या चि. स्वरा आणि चि. श्रीमई (वय ३ वर्षे) यांच्यासाठी थोडा खाऊ स्वतः समवेत घेतला. तेव्हा स्वरानेही प.पू. गुरुदेवांसाठी खाऊ घेतला आणि रामनाथीला गेल्यावर तिने तो त्यांना द्यायला सांगितला.

१ आ. ती प.पू. गुरुदेवांना ‘प.पू. बाप्पा’ असे म्हणते. एकदा प.पू. गुरुदेवांचे लांबून तिला दर्शन झाले. त्याविषयी ती सांगते, ‘त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला.’

१ इ. रात्री झोपल्यावर स्वप्नात प.पू. गुरुदेवांचा जयघोष करणे : एका रात्री माझ्या समवेत स्वरा बराच वेळ जागी होती. त्यावेळी ती प.पू. गुरुदेवांचा जयघोष करायची आणि मलाही प्रत्येक वेळी ‘तो कृतज्ञता भावाने करूया’, असे ती सांगत असे. नंतर रात्री झोपल्यावरही ती प.पू. गुरुदेवांचा जयघोष करण्याविषयी जोरजोरात बोलत होती. दुसर्‍या दिवशी उठल्यावर तिने मला सांगितले, ‘‘आई, रात्री मला स्वप्नामध्ये आपल्या समोरच्या इमारतीवर प्रचंडमोठे गुलाबी रंगाचे फूल दिसले. तेव्हा त्या फुलाला पाहून मी मोठ्याने जयघोष केला.’’

१ ई. स्वराला सनातन-निर्मित श्री दुर्गादेवीचे चित्र पुष्कळ आवडते. ती म्हणते, ‘दुर्गादेवी तिच्या हातांतील शस्त्रांनी भारताच्याशत्रूदेशाचा नाश करील !’

२. रामनाथी आश्रमातून कल्याण येथील घरी आल्यावर चि. स्वरामध्ये झालेले पालट

अ. तिचे हट्ट करण्याचे प्रमाण न्यून झाले.

आ. ती ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गात नियमित सहभागी होते.

इ. ती खोलीतून बाहेर जातांना दंडदीप, पंखे इत्यादी काळजीपूर्वक बंद करते आणि खेळून झाल्यावर खेळणी आवरून ठेवते.

ई. जेवायला बसण्यापूर्वी न विसरता हात स्वच्छ धुते आणि चहा पितांना लादीवर सांडल्यास तो पुसते.

उ. झोपण्याआधी प्रार्थना करून अत्तर आणि कापूर यांद्वारे उपाय करते.

ऊ. तिच्याकडून काही चुकले, तर त्या चुकीवर ती प्रायश्चित्त म्हणून उठाबशा काढून देवाची आणि माझी क्षमा मागते.

ए. मी श्रीमईवर योग्य कारणाविना ओरडले किंवा तिला मारले, तर मला स्वरा मला माझ्या चुकीची जाणीव करून देते आणिप्रायश्चित्तही घ्यायला सांगते.

३. साधनेची तळमळ

३ अ. स्वराला ‘राधे-गोविंद, श्रीकृष्ण-गोविंद’ अशी श्रीकृष्णाची गीते म्हणायला आवडतात.

३ आ. ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गात शिकायला मिळालेली सूत्रे कृतीत आणणे : ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग चालू झाल्यापासून स्वरामध्ये बरेच पालट झाले आहेत. ज्या दिवशी बालसंस्कारवर्ग नसतो, त्या दिवशी ती श्रीमईला तिच्या समोर बसवून ‘प्रार्थना आणि नामजप करणे, श्री गणपतिस्तोत्राचे पठण, कृतज्ञता व्यक्त करणे, गोष्ट सांगणे, विविध आदर्श कृती शिकवणे’ आदी सूत्रांच्या अनुषंगाने बालसंस्कारवर्ग घेते.

३ इ. साधनेत साहाय्य म्हणून इतरांना चुका सांगणे आणि स्वतःच्या चुकांविषयीही गांभीर्य असणे : एकदा सकाळी मी स्वरा आणि श्रीमई यांना अंघोळ घालत होते. त्या वेळी श्रीमईने तिच्या बाबांचे मोजे अंघोळीच्या पाण्यात टाकले; म्हणून मी तिला रागाने मारले. तेव्हा स्वरा मला म्हणाली, ‘‘ती लहान आहे तिला काय कळते ? तू तिला मारायला नको होते.’’ तेव्हा लगेच मी श्रीमईची क्षमा मागितली.

​त्या रात्री मी चुका लिहायला बसल्यावर ‘माझ्याकडून दिवसभरात झालेल्या चुका लक्षात आल्या का ?’, असे सर्वांना विचारले. तेव्हा स्वराने सकाळचा वरील प्रसंग माझ्या लक्षात आणून दिला आणि ती मला म्हणाली, ‘‘तू आधी चुका करतेस. त्यामुळे नंतर त्या तुला सारणीत लिहाव्या लागतात. तू सकाळी श्रीमईला मारले नसतेस, तर तुला सारणीत चूक लिहावी लागली नसती.’’ तेव्हा लगेच माझा भाऊ (श्री. अनिकेत प्रकाश मोरे) स्वराला म्हणाला, ‘‘त्या वेळी तुझी आई, तुलाही ओरडली होती ना ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘नाही ! त्या वेळी ती चूक आईची नव्हती, तर ती चूक माझीच होती.’’

४. स्वभावदोष

​‘आळशीपणा, चिडचिडेपणा, लक्षपूर्वक कृती न करणे आणि उलट उत्तर देणे

– सौ. श्रेया सुधीर महाडिक (स्वराची आई) कल्याण (पश्चिम), जिल्हा ठाणे. (ऑक्टोबर २०२०)

५. अनुभूती

​कु. स्वरा महाडिक हिची आजी सौ. प्रगती मोरे यांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतांना ‘स्वराच्या ठिकाणी श्रीदुर्गादेवीचे दर्शन होणे आणि त्या वेळी त्यांच्याकडून श्री दुर्गादेवीचा नामजप आपोआप चालू होणे : एकदा सकाळी ९ वाजतामी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यासाठी बसले होते. त्या वेळी मला एक दृश्य दिसले, ‘मी आणि माझ्या दोन्ही नाती (स्वरा अन् श्रीमई) उंच कड्यावरील अतिशय हिरव्यागार माळरानावर फिरत आहोत. त्या माळरानाच्या पुढे एक दरी होती आणि दोन्ही नाती लहान लहान दगड त्या दरीत टाकण्याचा खेळ खेळत होत्या. मी त्यांच्यापासून थोडे दूर बसून काहीतरी काम करत होते. तेव्हा स्वरा मला म्हणाली, ‘मी या दरीतील वाईट शक्तींना मारू का ?’ त्या वेळी मी (तिच्याकडे न बघता) विचारले, ‘तू कशाने मारणार त्यांना ?’ त्यावर ती म्हणाली, ‘दुर्गादेवीच्या हातातील त्रिशुळाने मारीन.’ तेव्हा मी तिच्याकडे बघितले, तर मला ‘तिच्या ठिकाणी सूक्ष्मातून दुर्गादेवी उभी आहे’, असे जाणवले. मी इतरत्र पाहून पुन्हा तिच्याकडे पाहिल्यावर मला तिथे स्वरा दिसली. अशा प्रकारे तिथे ‘एकदा दुर्गादेवी, तर नंतर स्वरा’, असे दृश्य दोन वेळा दिसले. तेव्हा ‘माझ्याकडून श्रीदुर्गादेवीचा नामजप कधी चालू झाला’, हे मला समजलेच नाही.’

– सौ. प्रगती मोरे (स्वराची आजी), नागोठणे, तालुका रोहा, जिल्हा रायगड.

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता