मृत्यूपूर्वी सर्व व्यावहारिक कर्तव्ये पूर्ण करणारे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तळमळीने समष्टी सेवा करणारे, कल्याण (जिल्हा ठाणे) येथील पू. माधव शंकर साठे !

साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था

पू. (कै.) माधव साठे

१. श्री. माधव साठे संत होणार असल्याची पूर्वसूचना

‘२३.४.२०२१ या दिवशी ‘माझा भाऊ माधव साठे याचे निधन झाले’, असे मला कळले. त्याच्या मुलींनी ‘तो रुग्णालयात असतांनाही त्याची समष्टी सेवा चालू होती’, हे सांगितल्यावर माझ्या मनात ‘तो संत होईल’, असा विचार आला. त्याच्या मृत्यूनंतर १२ व्या दिवशी त्याला संत घोषित केल्याचे समजले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला आणि गुरुदेवांनी मला आधी दिलेल्या विचाराविषयी कृतज्ञता व्यक्त झाली.

२. पू. माधव साठे यांच्याविषयी लक्षात आलेली वैशिष्ट्ये

श्रीमती शर्मिला पळणीटकर

२ अ. पू. माधव साठे यांनीच मला सकाळी लवकर उठून नामजप करण्याची सवय लावली. त्यामुळे मला सकाळी उठल्यापासून दिवसभर गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाता येते.

२ आ. परिस्थिती आनंदाने स्वीकारणे : पत्नीच्या शारीरिक आजारामुळे त्यांना घरातील सर्व कामे करावी लागत होती. पूर्वी त्यांना गरम गरम जेवण्याची सवय होती; परंतु पत्नी रुग्णाईत असल्यामुळे तिला स्वयंपाक करता येत नव्हता. त्यामुळे ते बाहेरून जेवणाचा डबा मागवत होते. तेव्हा त्यांनी बाहेरचे जेवण आनंदाने स्वीकारले आणि त्याविषयी कुणाकडेही तक्रार केली नाही.

२ इ. पत्नीची सेवा गुरुसेवा समजून करणे : पत्नीच्या शारीरिक त्रासामुळे त्यांना कुठेच जाता येत नव्हते. त्यामुळे ते रुग्णाईत पत्नीला सोडून कुठेही गेले नाहीत. त्यांनी प्रत्येक गोष्ट पत्नीला विचारून आणि तिच्या मनाप्रमाणे केली. कधी तिने बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली, तर ते लगेच जाण्याची सिद्धता करायचे आणि त्याच वेळी पत्नीने ‘नको जाऊया’, असे सांगितले, तर ते आनंदाने पत्नीचे म्हणणे स्वीकारायचे. त्यांनी ‘पत्नीची सेवाही गुरुसेवा समजून केली’, असे वाटते.

२ ई. मृत्यूपूर्वी सर्व व्यावहारिक कर्तव्ये पूर्ण करणे

१. पू. माधव साठे यांनी मृत्यूपूर्वी त्यांची सर्व व्यावहारिक कर्तव्ये पूर्ण केली. त्यात कुणालाही लक्ष घालावे लागले नाही. त्यांनी कल्याण (जिल्हा ठाणे) येथे भाडेतत्त्वावर घर घेतले हाते. १ मासापूर्वी त्यांनी त्या घराचा व्यवहार पूर्ण केला.

२. त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यावर तिचे मृत्यूत्तर सर्व कार्य त्यांनी पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांनी देह ठेवला.

३. त्यांच्या मुलीने गोव्याला घर घेतले होते. त्याचा सर्व व्यवहारही त्यांनी मुलीकडून पूर्ण करून घेतला.

२ उ. सेवेची तळमळ : पू. माधव साठे यांनी मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘दळणवळण बंदीमुळे घरी राहून सेवा करतांना संपर्क वाढवून सर्वांना गुरुदेवांनी सांगितलेली साधना करण्यास सांग.’’ त्यांनी मला माझ्या मैैत्रिणींचे भ्रमणभाष क्रमांक देण्यास सांगितले. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘मी या मैैत्रिणींना साधना आणि साधनेचे महत्त्व सांगितले आहे; पण त्यांना सनातनचे काही पटत नाही.’’ तेव्हा त्यांनी मला समष्टी साधना आणि आपत्काळ यांचे महत्त्व पटवून दिले अन् माझ्याकडून मैत्रिणींचे भ्रमणभाष क्रमांक मागून घेतले. मी त्यांना माझ्या २० – २५ मैैत्रिणींचे भ्रमणभाष क्रमांक दिले. त्यांनी त्यांना भ्रमणभाष केले आणि ‘त्या काय म्हणाल्या ?’, हेही मला सांगितले. नंतर पू. माधव साठे प्रत्येक वेळी त्यांना संपर्क करतांना मला सांगत होते.

२ ऊ. संतांचे चैतन्य कसे कार्य करते ? हे शिकायला मिळणे

१. पू. माधव साठे यांना माझ्या मैत्रिणींचे भ्रमणभाष क्रमांक दिल्यावर मी माझ्या मैत्रिणींना सांगितले, ‘‘तुमचा भ्रमणभाष क्रमांक माझ्या भावाला दिला आहे. तो तुम्हाला भ्रमणभाष करून साधना आणि गुरुपौर्णिमा याविषयी माहिती सांगील.’’ मैत्रिणींना हे सांगतांना मला समष्टी साधनेचा आनंद मिळत होता आणि सकारात्मक रहाता आले.

२. त्यांनी साधनेविषयी सांगितल्यावर माझ्या सर्व मैैत्रिणींनी अर्पण दिल्याचे समजल्यावर ‘संतांच्या वाणीतील चैतन्य कसे कार्य करते ?’, हे शिकायला मिळाले.

३. आमच्या कुटुंबातील काही नातेवाइकांनी गुरुपौर्णिमेचे अर्पण देणे बंद केले होते; परंतु वर्ष २०२० मध्ये संतांचे आज्ञापालन म्हणून पू. माधव साठे यांनी नातेवाइकांना संपर्क करून अर्पण देण्याविषयी सांगितले आणि सर्वांनी अर्पण दिले.

‘गुरुदेवा, पू. माधव साठे यांच्यासारखी आमच्याकडूनही शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करवून घ्या आणि तुमच्या अनुसंधान ठेवा’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्रीमती शर्मिला पळणीटकर (पू. माधव साठे यांची लहान बहीण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.५.२०२१)

साधकांना सूचना

साधकांना पू. माधव साठेकाकांकडून शिकायला मिळालेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे किंवा त्यांच्याविषयी अनुभूती आल्या असतील, तर त्या [email protected] या संगणकीय पत्त्यावर पाठवाव्यात.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक