सामाजिक अंतराच्या नियमांचा फज्जा !
संचारबंदीची घोषणा केली की, नागरिकांची जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडते, असे अनेक जिल्ह्यांत अनेक वेळा आढळले आहे. प्रशासन हे लक्षात घेऊन यावर आधीच उपाययोजना का काढत नाही ? शहराच्या रचनेनुसार प्रभागवार वेळेनुसार नियोजन करून लोकांना योग्यपद्धतीने सुविधा पुरवण्याचे नियोजन करावे ही अपेक्षा.
सोलापूर – जिल्ह्यात ८ ते १५ मे या कालावधीत कडक संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ६ मे या दिवशी घोषित केला. त्यामुळे ७ मे या दिवशी सकाळी ६ पासूनच सोलापूर शहरात नागरिकांनी किराणा आणि भाजीपाला खरेदीसाठी शहरातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी केली. कुंभार वेस, लक्ष्मी मार्केट, होम मैदान, जुळे सोलापूर, सत्तर फूट रोडे, मार्केट यार्ड येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे सामाजिक अंतरासह कोरोनाविषयक नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. (अशाने कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात वाढणार, याचे भान नागरिकांनी ठेवणे आवश्यक आहे ! – संपादक)