कराड (सातारा) येथे अनुमती न घेता घरपोच भाजीविक्री करणार्‍या ८ जणांवर कारवाई !

कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता विक्रेते आणि ग्राहक यांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करणेच त्यांच्या जीविताच्या दृष्टीने सुरक्षित आहे !

कराड – अनुमती न घेता घरपोच भाजी विकणार्‍या ८ भाजी विक्रेत्यांवर कराड नगरपालिकेने कारवाई केली आहे. किराणासह भाजीपाला घरपोच देण्यासाठी नगरपालिका अनुमतीपत्र (पास) देणार आहे. त्यापूर्वी विक्रेत्यांची कोरोनाची चाचणी सक्तीची केली आहे. त्यानुसार किराणा आणि भाजीविक्रेत्यांच्या तापसण्या चालू केल्या आहेत. आतापर्यंत ८० किराणा आणि भाजीविक्रेत्यांच्या चाचण्या झाल्या असून त्यामध्ये ६ किराणा दुकानदार, तर ४ भाजीविक्रेते कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पालिकेकडून सक्तीने सर्व विक्रवक्रेत्यांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. त्याशिवाय कुणालाही वस्तूंची घरपोच विक्री करता येणार नाही. त्यामुळे सर्व विक्रेत्यांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे.