५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रामनगर, बेळगाव येथील चि. प्रियांका गुरुदास गुंजेकर (वय २ वर्षे) !

चैत्र कृष्ण पक्ष एकादशी (वरुथिनी एकादशी) (७.५.२०२१) या दिवशी रामनगर, बेळगाव येथील चि. प्रियांका गुरुदास गुंजेकर हिचा दुसरा वाढदिवस आहे. सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर यांची ती पुतणी (लहान भावाची मुलगी) आहे. प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्त तिची आत्या कु. मंगल गुंजेकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. प्रियांका गुंजेकर

चि. प्रियांका गुरुदास गुंजेकर हिला द्वितीय वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. जन्मापूर्वी

१ अ. केलेले व्रत : ‘बाळाचा जन्म व्हायच्या आधी बाळाची आई सौ. जयंती गुंजेकर हिने अंगारक योग, म्हणजे गणपतीचे संकष्टी व्रत केले होते.

१ आ. अनुभूती – मार्गशीर्ष मासातील शेवटच्या गुरुवारी पूजेच्या आधी दुपारी एक गाय घरी येणे आणि तिने वहिनीच्या अंगाला चिकटून अंग घासून जाणे : मार्गशीर्षातील शेवटच्या गुरुवारची पूजा भर दुपारी १२ वाजता करतात. सौ. जयंती यांनी पूजेची सिद्धता केली. एवढ्यात एक गाय आली आणि उंबरठ्यावर दोन्ही पाय ठेवून उभी राहिली. मी वहिनीला ‘गाय आली आहे’, असे सांगितले. तिने गायीचे पाय धुवून तिची पूजा केली आणि तिला खायला दिले. तरी ती गाय गेली नाही. वहिनीच्या अंगाला चिकटून पूर्ण घासून झाल्यावरच ती गाय गेली. त्यानंतर वहिनीने गुरुवारची पूजा केली.

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते १ वर्ष

१. बाळाचा जन्म चैत्र कृष्ण पक्ष एकादशी (वरुथिनी एकादशी)(३०.४.२०१९) या दिवशी झाला.

२. बाळ घरी आल्यावर पू. दादा (पू. शंकर गुंजेकर) म्हणाले, ‘‘बाळाचे रडणे ऐकायला अगदी गोड वाटते.’’

३. पू. शंकर गुंजेकर यांना ‘प्रियांका’ हे नाव पुष्कळ आवडते; म्हणून बारशाच्या दिवशी बाळाचे नाव ‘प्रियांका’ ठेवले.

४. प्रियांका दोन मासांची झाल्यापासून तिचे बाबा तिला पू. दादांच्या घरी आणून ठेवायचे. दिवसभर ती पू. दादांच्या घरीच रहायची आणि रात्री झोपायच्या वेळी ते तिला घेऊन जायचे. श्रीमती शेवंती गुंजेकर नामजपाला बसतांना तिला घेऊन मोठ्या आवाजात नामजप करायच्या. तेव्हा ती ‘हुं, हुं’, असा आवाज करायची. तेव्हा ‘ती नामजप करायचा प्रयत्न करत होती’, असेमला वाटले.

५. पू. दादांची मुलगी कु. आरती हिने कोरोना विषाणूविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण होण्यासाठी असलेला नामजप मोठ्याआवाजात केल्यावर प्रियांका नाचायची आणि हसायची.

६. प्रियांका एक वर्षाची झाली. तेव्हा तिच्या बाबांनी तिचा पहिला वाढदिवस पू. दादांच्या घरी केला. पू. दादांनी तिला भेटवस्तू दिली.

२ आ. वय – १ वर्ष ते २ वर्षे

२ आ १. व्यवस्थिपणा : घरात कोणतीही वस्तू खाली पडलेली दिसली, तर प्रियांका ती वस्तू जागेवर नेऊन ठेवते.

२ आ २. पू. शंकर गुंजेकरमामांचे अनुकरण करणारी चि. प्रियांका ! : पू. दादा पूजा करतांना ती त्यांच्याकडे जाते आणि स्वतःही तशीच पूजा करते. ते तुळशीला प्रदक्षिणा घालतात. तेव्हा तीही तुळशीला प्रदक्षिणा घालते.

२ आ ३. भाव  

अ. प्रियांका श्रीकृष्णाचे चित्र दाखवते आणि त्याला डोके टेकून नमस्कार करते.

आ. प्रियांका पू. दादांना आणि घरातील सर्वांना नमस्कार करते. ती पू. दादांच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवते.

२ आ ४. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेली ओढ !

२ आ ४ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रावरून प्रेमाने हात फिरवणे : पू. दादांनी तिला ‘परात्पर गुरु डॉक्टर कुठे आहेत ?’, असे विचारले की, ती त्यांच्या छायाचित्राकडे बोट करून दाखवते आणि छायाचित्रावरून हात फिरवते.

२ आ ४ आ. ‘तू परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायला रामनाथी आश्रमात येणार का ?’, असे विचारल्यावर त्वरित साधिकेकडे जाणे: सौ. केतकी पेडणेकर रामनाथी आश्रमात जातांना पू. दादांना भेटायला घरी आल्या होत्या. तेव्हा प्रियांका पू. दादांच्या घरात होती. पू. दादांनी त्यांना ‘ही आमची प्रियांका !’, असे सांगितले. तेव्हा केतकी ताई तिला म्हणाल्या, ‘‘तू परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायला रामनाथी आश्रमात येणार का ?’’ तेव्हा ती लगेच त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. नंतर ती कुणाकडे बघायला आणि यायलाही सिद्ध नव्हती. मग केतकी ताई तिला म्हणाल्या, ‘‘तू मोठी झाल्यावर ये !’’ तेव्हा ती पू. दादांकडे गेली.

३. कृतज्ञता

​परात्पर गुरु डॉक्टर आणि कुलदेवी यांनीच प्रियांका विषयीची सूत्रे माझ्याकडून लिहून घेतली. त्याविषयी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मंगल गुंजेकर (आत्या), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.४.२०२१)