सातारा येथे भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

सातारा, ६ मे (वार्ता.) – पश्‍चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. महिलांवर सामुहिक बलात्कार करून त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. अशा गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.  या वेळी जावळी-सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, गणेश पालखे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

निवेदनामध्ये म्हटले आहे की, पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीनंतर तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार चालू केला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या होत असून महिला कार्यकर्त्यांवर सामुहिक बलात्कार करून हत्या केल्या जात आहेत. तसेच भाजप कार्यकर्त्यांच्या दुकानांना, घरांना आगी लावर्‍याचे काम तृणमुल काँग्रेसचे गुंड करत आहेत. ही लोकशाहीची हत्या असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करत आहोत.

वाई (जिल्हा सातारा) प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर भाजपची निदर्शने

पश्‍चिम बंगालमधील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करणार्‍यांवर कारवाई करण्याविषयी वाई (जिल्हा सातारा) येथील प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. या वेळी सातारा जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे, युवा मोर्चा सरचिटणीस यशराज भोसले, जिल्हा सरचिटणीस यशवंत लेले, शहराध्यक्ष राकेश फुले, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस आमोल भोसले, काशिनाथ शेलार आदी उपस्थित होते.