गर्भारपणात अनेक महिलांना वेगवेगळे पदार्थ खाण्याचे डोहाळे लागतात. ही सर्वसामान्य गोष्ट आहे. अर्थात्च त्यांचे डोहाळे घरातील कुटुंबीय आनंदाने पुरवतातही. नुकतेच वाचनात आले, ते म्हणजे एका प्रसिद्ध अभिनेत्रीला तिच्या गर्भारपणात पिझ्झा आणि बर्गर हे पदार्थ खाण्याचे डोहाळे लागले होते. सध्याच्या काळात हे पदार्थ अगदीच नित्याचेच झाले आहेत आणि त्यातही एखाद्या अभिनेत्रीने ते खाल्ले, हे ऐकून तिला आदर्श (?) मानणार्या अनेक गर्भवती महिलाही त्याच स्वरूपाचे पदार्थ ग्रहण करण्याचा प्रयत्न करतील, यात शंका नाही. अभिनेत्री जे म्हणेल किंवा त्या करतील, ती पूर्व दिशा असते; पण त्यात सारासार विचार कोण करतो ? गर्भासाठी काय आवश्यक आहे, असा विचार त्या करत नाहीत. ज्या महिला गर्भारपणातच अशा कृती करत असतील, त्या पुढे बाळाला कशा पद्धतीने घडवतील, याचा विचारच न केलेला बरा ! आपण जे पदार्थ ग्रहण करतो, त्याचा आपले शरीर आणि मन यांच्यावर स्थूल अन् सूक्ष्म अशा दोन्ही माध्यमांतून परिणाम होत असतो, हे अन्नशास्त्र आहे. त्यामुळे पिझ्झा आणि बर्गर, तसेच चायनीज पदार्थ यांचा मानवावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे याचा गर्भवती महिलांनी विचार करायला हवा.
डोहाळ्याविषयी रामायणातील माता कौसल्येचे उदाहरण शिकण्यासारखे आहे. दशरथ राजा जेव्हा समाधीस्थ बसलेल्या आणि गर्भवती असणार्या कौसल्येला डोहाळ्यांविषयी विचारतो, तेव्हा ती काहीच बोलली नाही. शेवटी राजा म्हणाला, ‘‘आपल्या आयुष्यात आता संतानप्राप्तीचे सुख येत आहे. इतके दिवस त्या रावणाने नुसता छळ मांडला होता, हे तू विसरलीस का ? भानावर ये.’’ रावणाचे नाव ऐकताच कौसल्या रागाने लालबुंद झाली. ती म्हणाली, ‘‘मला धनुष्य द्या, त्यावर बाण चढवून मी निर्दयी रावणाचा वध करणार आहे.’’ या प्रसंगानंतर वसिष्ठ ऋषि म्हणाले, ‘‘कौसल्येला कडक डोहाळे लागले आहेत. तिने जे सांगितले, त्यावरूनच समजते की, तिच्या पोटी जन्म घेणारे बाळ कुणी सामान्य नसून रावणाचा नयनाट करणारा अजातशत्रू त्रिभुवनपालक भगवंत आहे.’’ प्रत्यक्षातही तसेच झाले. कौसल्येच्या पोटी रावणाचा वध करणार्या श्रीरामाचा जन्म झाला. जे गर्भाला जाणवत होते, ते कौसल्येने जाणले होते. यावरूनच तेव्हाच्या काळातील तिचा आहार किती सात्त्विक आणि बलवर्धक असेल, याची कल्पना येते. यावरून गर्भवतींनी ठरवावे की, आदर्श नेमका कुणाचा ठेवायचा ? प्रसिद्ध अभिनेत्रीचा कि माता कौसल्येचा ?
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.