संगीत आणि वाद्ये यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
१. शब्दोच्चार तोंडातल्या तोंडात केल्यास ते गाणे वरवरचे होऊन हवेतच विरून जाणे आणि ते योग्य उच्चारानुसार म्हटल्यास अक्षरब्रह्म जागृत होऊन त्याचा परिणाम स्वतःवर अन् ऐकणार्यांवरही अधिक होणे
‘आम्ही श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘विष्णु वैभवं…’ हे गीत म्हणून दाखवले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘या गीतातील प्रत्येक अक्षर त्याच्या योग्य उच्चारानुसारच आले पाहिजे. जसे ‘वैभवं’, ‘पद्मनाभम्’ मधील ‘भ’ आणि ‘नारायणं’ मधील ‘र’ यांचा उच्चार स्पष्ट यायला हवा, तसेच ‘नारायणं’ म्हणतांना ‘यणं’ हा पूर्ण आतून म्हणायला हवा, ज्यामुळे या शब्दाची स्पंदने आत आंदोलित होऊन त्या शब्दांच्या आघाताने नारायणतत्त्व जागृत होईल. गीतातील ‘क्ष’, ‘ण’, ‘ख’ आणि ‘ध’ हे उच्चारही स्पष्ट यायला हवेत. संगीतातील शब्दोच्चार तोंडातल्या तोंडात न करता योग्य उच्चार करायला हवेत. उच्चार तोंडातल्या तोंडात केल्यास ते गाणे वरवरचे होऊन हवेतच विरून जाते. ते योग्य उच्चारांनुसार म्हटल्यास अक्षरब्रह्म जागृत होऊन त्याचा परिणाम स्वतःवर आणि ऐकणार्यांवरही अधिक प्रमाणात होतो.’’
२. श्रीविष्णूचा पाळणा झुलवतांना बसवलेल्या गीताची लय आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ अन् श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ श्रीविष्णूला देत असलेल्या झुल्याची लय आपोआप जुळणे
श्रीविष्णूचा पाळणा झुलवतांना एक गीत बसवले होते. या गीताची गती झुल्याच्या गतीप्रमाणे जरा संथ हवी होती. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ श्रीविष्णूला देत असलेल्या झुल्याची गती अन् आमच्या गीताची गती देवाच्या कृपेने लगेचच जुळली. तेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘ही अंतर्मनाची लय आहे. ती देवाची लय असल्यामुळे एकमेकांना ठाऊक नसतांनाही तुमची गायनाची लय आणि आमची झुला द्यायची लय एका झटक्यात आपोआप जुळली.’’ त्या वेळी ‘देवच सर्व करून घेत होता’, हे लक्षात आले.
३. दाक्षिणात्य संगीत पद्धतीपेक्षा उत्तर भारतीय संगीत श्रेष्ठ असणे
‘आम्ही ‘श्रीमन् नारायण….’ हे विष्णुगीत कर्नाटकी गायन पद्धतीने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना म्हणून दाखवले. त्या वेळी त्यांनी ‘कर्नाटक संगीत’ आणि ‘उत्तर भारतीय संगीत’ यांतील भेद सांगितला. त्यांनी दाक्षिणात्य संगीत पद्धतीपेक्षा उत्तर भारतीय संगीत श्रेष्ठ असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘दक्षिण भारतीय संगीतात हेलकावे (आंदोलने) फार आहेत. उत्तर भारतीय संगीतात हेलकावे नाहीत. या संगीतात शब्दफेक सरळ असल्याने त्याची आस आणि सात्त्विकता टिकून रहाते. त्यामुळे ते संगीत श्रेष्ठ आहे.’’
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आमच्याकडून दाक्षिणात्य पद्धतीने बसवलेले गीत उत्तर भारतीय संगीत शैलीप्रमाणे बसवून आणि म्हणून घेतले.
४. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘आता तुम्ही अक्षरब्रह्म शिकायला हवे’, असे सांगणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आम्हाला म्हणाल्या, ‘‘तुमचे नादब्रह्म आणि तालब्रह्म शिकून झाले. आता तुम्ही अक्षरब्रह्म शिकायला हवे. त्यासाठी तुम्ही अक्षरब्रह्माला प्रार्थना करा. आता प्रत्येक वेळी कोणतेही गीत म्हणतांना त्यातील अक्षरांचा योग्य उच्चार करून म्हणण्याचा प्रयत्न करा.’’
५. गीतामध्ये देवाचे नाम जेवढे अधिक, तेवढे ते गीत भावजागृतीसाठी चांगले !
भगवंताच्या नामाने ऐकणार्यांचीही भावजागृती व्हायला साहाय्य होते, उदा. ‘विष्णु वैभवं…’मध्ये ‘नारायणं’, ‘जय राम रमा रमणं..’ मध्ये ‘श्रीराम’ इत्यादी.
६. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार गाण्याचा प्रयत्न केल्यानंतर जाणवलेला पालट
अ. ‘विष्णु वैभवं…’ या गीतातील ‘भ’, ‘र’, ‘क्ष’ आणि ‘ण’ या अक्षरांचा गातांना स्पष्टोच्चार केल्यावर आम्हाला प्रारंभी दम लागू लागला. तेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘हे सगळे शब्द नाभीपासून योग्य पद्धतीने म्हटल्याने तसे होते आहे. सध्या अशा स्पष्ट उच्चारांची सवय नसल्याने तुम्हाला दम लागतो. एकदा अशा उच्चारांची सवय झाली की, तुम्हाला गाणे सहज म्हणता येईल.’’ अशा प्रकारे गायनाचा सराव केल्यानंतर कालांतराने गीते म्हटल्याने स्वतःला चैतन्य मिळून ‘आम्ही त्या गीताच्या आत जात आहोत’, असे आम्हाला अनुभवायला आले.
आ. गाण्याचा वरीलप्रमाणे सराव करतांना आनंद जाणवत होता.’
– कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०२०)
‘संगीत’ या विषयावर मिळालेले ज्ञान !१. संगीत आणि नृत्य यांत सत्त्व-रज गुण येण्याचे कारण ‘संगीतासह नृत्य आले की, ‘रजोगुणी आनंद’ आला. संगीत सत्त्वगुणी आहे. शरिराची हालचाल झाली की, रजोगुण वाढतो; पण नृत्य करणारी व्यक्ती ७० टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढची असेल, तर असे होत नाही. २. तमोगुणी, रजोगुणी आणि सत्त्वगुणी वाद्ये चर्मवाद्ये तमोगुणी असतात. सतारसारखी तंतूवाद्ये रजोगुणी असतात आणि बासरी, वेणू ही वाद्ये सत्त्वगुणी असतात. सर्व सुशीर (फुंकरीद्वारे नाद उत्पन्न केला जाणारी) वाद्ये सत्त्वगुणी असतात; कारण त्यातून येणारे संगीत हे पोकळीतून आणि आकाशतत्त्वातून येणारे असते. यातील काही वाद्यांचा पुन्हा सत्त्व-रज आणि तम या तीन गुणांच्या दृष्टीने विचार करावा लागतो. जसे चर्मवाद्यांमध्ये ‘मृदंग’ हे सत्त्वगुणी वाद्य, तर लावणीसाठी वाजवली जाणारी ‘ढोलकी’ ही तमोगुणी वाद्य आहे.’ – (श्रीचित्शक्ति) सौ. अंजली गाडगीळ, मदुराई, तमिळनाडू. (१७.२.२०१५) |