काशिळ (जिल्हा सातारा) येथील ग्रामीण रुग्णालयात चालू होणार कोविड रुग्णालय !

कोरोनाने महाभयंकर रूप धारण केलेले असतांना काशिळ येथील ग्रामस्थांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर कोविड रुग्णालय चालू होते. तर अगोदरच त्यांची आवश्यकता ओळखून प्रशासनाने रुग्णालय का चालू केले नाही ?

काशिळ (जिल्हा सातारा) ग्रामीण रुग्णालय

सातारा – अनुमाने वर्षभरापूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोविड रुग्णालय चालू करण्याचे आश्‍वासन काशिळवासियांना दिले होते; मात्र अद्याप कोणतीही कृती झाली नव्हती. त्यामुळे येथील कोविड रुग्णांना सातारा येथील रुग्णालयामध्ये यावे लागत होते; परंतु आता मेच्या पहिल्या आठवड्यात काशिळ येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय चालू होत आहे.

गतवर्षी काशिळ आणि पंचक्रोशीतील अनेक रुग्णांना कोणतीही सुविधा उपलब्ध न झाल्याने जीव गमवावा लागला होता. तेव्हा स्थानिकांनी काशिळ ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय चालू करण्यासाठी प्रयत्न केले होते; परंतु चालू झाले नाही. तरीही स्थानिकांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि स्थानिक पत्रकार संघाच्या विशेष प्रयत्नांमुळे कोविड रुग्णालय चालू होत आहे. या रुग्णालयामध्ये ३२ आयसीयू बेड आणि ३१ ऑक्सिजन बेड असणार आहेत. प्रथम ऑक्सिजन बेड आणि नंतर आयसीयू बेड कार्यान्वित होणार आहेत.