कवठेमहांकाळ शहरातील नागरिकांचा जनता कर्फ्युुचा निर्णय स्वागतार्ह ! – जयंत पाटील, पालकमंत्री

कवठेमहांकाळ येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक घेतांना पालकमंत्री जयंत पाटील (मध्यभागी), तसेच अन्य

कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली) – कवठेमहांकाळ शहरातील नागरिकांनी घेतलेला जनता कर्फ्युचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. अशा प्रकारचा निर्णय स्वयंस्फूर्तीने प्रत्येक तालुका स्तरावर स्थानिक प्रशासनाने घ्यावा, तरच कोरोनाची साखळी तोडण्यात आपण यशस्वी होऊ. जनता कर्फ्यु लावतांना शेतकर्‍याच्या मालाला यातून सवलत मिळावी, तसेच भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू घरोघरी मिळतील याविषयीचे नियोजन करावे, अशा सूचना जलसंपदा अन् लाभक्षेत्र विकास मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. कवठेमहांकाळ येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठकीत ते बोलत होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले, कोरोनाला रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा वाढवण्यावर भर देण्यात यावा. रुग्णांची संख्या अधिक असलेल्या भागात कंटेनमेंट झोन घोषित करून कडक निर्बंध पाळले जातील याची काळजी घ्यावी. कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथील कोविड रुग्णालय तातडीने चालू करण्याविषयी कार्यवाही करण्यात यावी. सांगली जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे सुमारे ४७ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.