सातारा येथे मागील मार्गाने दुकाने चालू ; प्रशासनाचे दुर्लक्ष 

सातारा, १ मे (वार्ता.) – प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने वेळेत उघडत आहेत आणि बंदही होत आहेत; मात्र बंद दिसणारी काही दुकाने मागील मार्गाने चालू असल्याचे आढळून येत आहे. याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे कि काय ?, अशी शंका नागरिक व्यक्त आहेत. (प्रशासनाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. – संपादक)   

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने चालू असल्याने शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे परिणाम अधिकच गंभीर होतात कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात प्रतिदिन २ सहस्रांहून अधिक रुग्ण बाधित होत आहेत. अशातच सर्वजणच नियम पाळत आहेत, असे नाही. ११ वाजल्यानंतरही मागील मार्गाने काही दुकानदार स्वत:ची दुकाने शटर ओढून चालू ठेवत आहेत. प्रशासकीय यंत्रणा तोकडी असली, तरी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सूज्ञ नागरिक करत आहेत.