बेंगळुरूमधील २-३ सहस्र कोरोनाबाधित रुग्ण ‘बेपत्ता’ ! – कर्नाटक सरकार

बंगळुरू (कर्नाटक) – येथील कोरोनाचा संसर्ग झालेले २-३ सहस्र रुग्ण बेपत्ता झाल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री आर्. अशोका यांनी दिली. अशोका हे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्षही आहेत.

अशोका म्हणाले की, बेंगळुरूमधील २-३ सहस्र कोरोना रुग्णांनी त्यांचे दूरभाष बंद केले आहेत. हे रुग्ण कुठे गेले आहेत, याविषयी आम्हाला कोणतीही माहिती नाही. त्यामुळे त्यांना बेपत्ता म्हणत आहोत. याविषयी पोलिसांना माहिती देण्यात आली असून या रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. हे रुग्ण कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार करणारे ठरू शकतात. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण बेंगळुरूमध्ये आहेत. तसेच एकूण मृत्यूंपैकी दोन तृतीयांश मृत्यू बेंगळुरूमध्ये नोंद झाले आहेत.