कोरोना महामारीशी संबंधित गोव्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी

केंद्राकडून गोव्याला २० सहस्र लिटर अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा

केंद्रशासनाने गोव्याला २० सहस्र लिटर अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा करणार असल्याचे म्हटले आहे. प्रतिदिन मिळणार्‍या ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या जोडीला एक दिवस आड या स्वरूपात हा अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

मडगाव येथे कोरोनाबाधित रुग्ण सार्वजनिक ठिकाणी उघडपणे फिरत असल्याच्या तक्रारी

मडगाव शहरात कोरोनाबाधित रुग्ण उघडपणे सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याच्या तक्रारी आहेत. याविषयी एक महिला प्रसारमाध्यमांना म्हणाली, ‘‘कोरोनाबाधित रुग्णांना मी बाजारात फिरतांना पाहिले. कोरोनाबाधित रुग्ण गुपचूपपणे कुटुंबासहित बाजारातील दुकानांमध्ये सामान खरेदी करत आहेत. हे रुग्ण इतरांशी संपर्क येऊ नये, यासाठी कुठलीच काळजीही घेत नाहीत. मी त्यांना याविषयी सांगणार होतो; पण मला त्यांच्याजवळ जायला भीती वाटू लागली. याविषयी मी आरोग्य केंद्राला कळवले आहे.’’

याविषयी मडगाव आरोग्य केंद्रातील एक डॉक्टर म्हणाले, ‘‘कोरोनाबाधित रुग्ण गृहअलगीकरणात रहात आहे ना, यावर देखरेख ठेवण्याचे दायित्व स्थानिक पंचायत आणि पालिका यांना देणे आवश्यक आहे अन्यथा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढणार. आरोग्य केंद्रातील कर्मचारी यावर देखरेख ठेवू शकत नाहीत.’’ मडगाव येथे राज्याच्या तुलनेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत.