पोलिसांनी रात्रभर ऑक्सिजनची गाडी रोखून धरल्याने कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचा दावा

पोलीस अधीक्षकांचा चौकशीचा आदेश !

प्रतीकात्मक छायाचित्र

जींद (हरियाणा) – येथे ऑक्सिजन घेऊन जाणार्या गाडीला पोलिसांनी रात्रभर रोखून ठेवल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनी मात्र त्यांच्यावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी म्हटले, ‘या गाडीत २ ऑक्सिजन सिलिंडर सापडले होते. त्यानंतर वाहनचालकाने घटनास्थळावर आवश्यक कागदपत्रे दाखवली नाहीत. नंतर त्याने कागदपत्रे दाखवल्याने रात्रीच्या वेळीच त्याला सोडण्यात आले होते.’ या प्रकरणी जींद पोलीस अधीक्षकांनी चौकशीचा आदेश दिला आहे. ते म्हणाले की, आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येईल.

येथील एक इनोव्हा चालक कोरोना रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी पंजाबच्या धुरीहून ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जात होता. त्याला रुग्णाचा ऑक्सिजन संपण्यापूर्वी हरियाणा आणि देहली ओलांडून रात्री ३ वाजेपर्यंत गाझियाबाद याठिकाणी जायचे होते; मात्र रात्री ११ च्या सुमारास जींद पोलिसांनी त्याला मध्येच रोखले. गाडीची तपासणी केल्यानंतर त्याला सकाळी सोडून दिले; पण तोपर्यंत संबंधित कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता.