वंशसंहार : आर्मेनियन्सचा आणि हिंदूंचा !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी वर्ष १९१५ मध्ये ओटोमन (उस्मानी) साम्राज्यात आर्मेनियन वंशाच्या लोकांचा वंशविच्छेद झाल्याच्या सूत्राला मान्यता देणार असल्याचे घोषित केले आहे. जगाला नाझींनी ज्यूंचे केलेले हत्याकांड ठाऊक आहे. त्यानंतर सर्वांत क्रूर आणि अमानवी नृहसंहार अर्मेनियन वंशाच्या लोकांचा करण्यात आला, अशी मान्यता आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी ओटोमन साम्राज्याचा सुल्तान हा जर्मनीसमवेत होता. ओटोमन हे मुसलमान आक्रमकांचे साम्राज्य, तर आर्मेनिया वंशाचे लोक ख्रिस्ती होते. ओटोमन साम्राज्यात आर्मेनियन वंशाचे लोक समूहाने विविध ठिकाणी रहात होते. त्यांच्यावर त्या काळातही अत्याचार होत होते. पहिल्या महायुद्धाच्या वेळी ओटोमन साम्राज्यातील आर्मेनियन लोकांनी रशियाला विविध प्रकारे साहाय्य केले. त्या वेळी ‘आर्मेनियन लोक हे ओटोमन साम्राज्याशी निष्ठावान नाहीत’, असे सांगत त्यांच्या वंशविच्छेदाचा आदेश देण्यात आला. सुमारे १५ लाख लोकांचा नरसंहार करण्यात आल्याचा अनुमान वर्तवण्यात येत आहे. ओटोमन साम्राज्यातील आर्मेनियन लोकांना पकडून त्यांना उपाशी ठेवून त्यांना ‘मृत्यू यात्रे’वर पाठवण्यात येत असे. ही मृत्यू यात्रा म्हणजे त्यांना सिरीयाच्या वाळवंटात अनवाणी सोडले जात असे. त्या वेळी अन्न आणि पाणी न मिळाल्यामुळे अनेक लोकांचा या वाळवंटात तडफडून मृत्यू झाला. आर्मेनियन वंशाच्या महिला आणि मुले यांच्यावरही विविध प्रकारचे अत्याचार करण्यात आले. महिलांवर बलात्कार करण्यात आला, तर बऱ्याच महिलांची विक्री करण्यात आली. साधारण १०६ वर्षांपूर्वी पद्धतशीरपणे करण्यात आलेल्या या वंशसंहाराला बायडेन यांचे सरकार मान्यता देणार आहे. यामुळे जागतिक राजकारणात उलथापालथ होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. आर्मेनियन लोकांच्या वंशसंहाराला अजूनही काही देश मान्यता देत नाहीत. अमेरिकेने हे पाऊल उचलल्यामुळे तुर्की आक्रमकांचा हा क्रूर आणि पाशवी इतिहास पुन्हा अभ्यासला जाईल. यामुळे आर्मेनियन लोकांना न्याय मिळेल; मात्र हिंदूंचे काय ? हिंदूंच्या वंशसंहाराला जागतिक स्तरावर कधी मान्यता मिळणार आणि त्याही पुढे जाऊन त्यास उत्तरदायी असणाऱ्यांवर कारवाई कधी होणार ?

आर्मेनियन वंशाच्या लोकांचा वंशविच्छेद (सौजन्य : The Armenian Genocide museum)

बायडेन यांची चाल !

जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी प्रसार करतांना ‘सत्तेवर आल्यास आर्मेनियन लोकांचा वंशसंहार झाला’, यास मान्यता देईन’, असे घोषित केले होते. याआधी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आर्मेनियन लोकांच्या वंशसंहाराला मान्यता देण्याकडे दुर्लक्ष केले होते. याला कारणही तसेच होते. ट्रम्प आणि तुर्कस्तानचे पंतप्रधान तय्यप एर्दोगन यांचे राजनैतिक संबंध चांगले होते. ट्रम्प आणि सिरीयाचे राष्ट्रपती बशर अल् असद यांचे बिनसले होते, तसेच एर्दोगन आणि असद यांचेही संबंध चांगले नाहीत. त्यामुळे ट्रम्प आणि एर्दोगन यांचे मेतकूट जमले. आता बायडेन सत्तेत आले आहेत. त्यांनी आर्मेनियन लोकांच्या वंशसंहाराचे सूत्र उकरून काढल्यामुळे तुर्कस्तानचे पंतप्रधान तय्यप एर्दोगन यांचे पित्त खवळले आहे. ‘अमेरिकेने अशी भूमिका घेतली, तर त्याचे परिणाम वाईट होतील’, असे तुर्कस्तानने म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व तुर्कस्तानचे पंतप्रधान तय्यप एर्दोगन

इस्लामी देशांचे प्रतिनिधित्व कुणी करायचे, यावरून त्या देशांमध्ये स्पर्धा आहे. सध्या इस्लामी देशांचे प्रतिनिधित्व सौदी अरेबियाच्या राजघराण्याकडे आहे. एर्दोगन यांना पुन्हा ‘मुसलमानांचा खलिफा’ व्हायचे आहे. त्यामुळे ओटोमन साम्राज्यावर कुठलाही कलंक लागलेला त्यांना मान्य नाही. बायडेन यांना स्वतःच्या सरकारची परराष्ट्रनीती काय असेल, हे जगाला दाखवून द्यायचे आहे, तसेच ‘अमेरिकेचे सरकार हे मानवाधिकारांचे पाईक आहे’, असेही चित्र त्यांना जगासमोर उभे करायचे आहे. त्यामुळे आर्मेनियन लोकांच्या वंशविच्छेदाचे सूत्र उपस्थित करून त्यांना स्वतःचे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने वाटचाल करायची आहे. याला ‘ख्रिस्ती विरुद्ध मुसलमान’, असाही एक पदर आहे. यावर कुणी भाष्य करण्यास सिद्ध नाही; मात्र वंशविच्छेदाचे हे सूत्र ख्रिस्ती विरुद्ध मुसलमान यांच्यातील छुप्या युद्धाचाही भाग आहे.

अमेरिका स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कुठल्याही गोष्टीत हस्तक्षेप करत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे तुर्कस्तानला चाळवून बायडेन नेमके काय साध्य करणार आहेत, हे येणारा काळच सांगेल.

हिंदूंच्या वंशसंहाराला मान्यता कधी ?

आर्मेनियन लोकांचा वंशसंहार झाला, हे अमेरिकेने मान्य करण्याची मागणी अमेरिकेतील आर्मेनियन लोकांनी केली होती. तसे आश्वासनही बायडेन यांनी निवडणुकीच्या वेळी दिले होते. या आश्वासनाची आता पूर्तता होणार आहे. आर्मेनियन लोकांना अमेरिकेचे राष्ट्रध्यक्षपदाचे उमेदवार आश्वासन देतात आणि सत्तेत आल्यावर त्याची पूर्तता करतात, हे कौतुकास्पद आहे; मात्र हिंदूंचे काय ? ‘हिंदूंच्या वंशविच्छेदाला मान्यता देईन’, ‘त्यांना न्याय मिळवून देईन’, अशी आश्वासने अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार कधी देतील का ? सध्या लसीसाठी आवश्यक कच्चा माल पुरवण्यावर निर्बंध उठवण्याविषयी अमेरिकेने दाखवलेली अरेरावी आपण पाहिली आहे. ही सर्वच सूत्रे अमेरिका भारताचा मित्र नाही, हेच दर्शवतात. अमेरिकेतील हिंदू जागरूक आहेतच. आता आमेरिकेतील आर्मेनियन लोकांनी जसे त्यांच्या समूहाच्या वंशविच्छेदाचे सूत्र लावून धरले, तसे तेथील हिंदूंनीही हे सूत्र लावून धरणे अपेक्षित आहे.

इस्लामी आक्रमकांनी आणि त्याही पुढे जाऊन भारतातील धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार केले, याविषयी आता सरकारी स्तरावर जोरकसपणे बोलण्याची वेळ आली आहे. हे हिंदूंना न्याय आणि आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी आवश्यक आहे. यासाठी अमेरिकाच काय अन्य कुठलाही देश भारताला साहाय्य करील, अशी अपेक्षाच नको; कारण भारतद्वेषाने पछाडलेल्या पाश्चात्त्य देशांना भारताचे आणि त्याहून अधिक हिंदूंचे भले झालेले पहावत नाही. आर्मेनिया हा ख्रिस्ती देश. त्याच्या मागे ख्रिस्ती देश उभे रहातील. भारत हा हिंदूबहुल देश. त्याच्या मागे कोण उभे रहाणार ? ख्रिस्ती आर्मेनियन लोकांच्या वंशविच्छेदाविषयी ख्रिस्ती अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेतून भारताने शिकावे आणि स्वतःची परराष्ट्रनीती हिंदुत्वाला केंद्रभूत ठेवून आखावी. तसे केले, तरच हिंदूंना आणि भारताला गतवैभव प्राप्त होईल !