रुग्णाईत असतांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या सतत अनुसंधानात राहून शांत आणि स्थिर झालेल्या अन् ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या पुणे येथील कै. श्रीमती सुशिला नागनाथ साळुंखे !

२७ एप्रिल या दिवशी कैै. श्रीमती सुशीला साळुंके यांचा जीवनपट पाहिला. आज २८ एप्रिल या दिवशी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना चालू केल्यावर आणि रुग्णाईत झाल्यावर त्यांच्यात झालेले लक्षणीय पालट पाहूया.

कै. श्रीमती सुशिला नागनाथ साळुंखे

 भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/471976.html


२. सौ. प्रार्थना बुवा (नात), पुणे

२ इ. सनातन संस्थेच्या माध्यमातून केलेली साधना !

२ इ १. सनातन संस्थेशी परिचय झाल्यानंतर प्रथम नामजप आणि नंतर हळूहळू सेवा करू लागणे : ‘आजीने वर्ष २००७ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. आरंभी नामजप करून हळूहळू तिने सेवा चालू केली. त्या वेळी तिने घराच्या आजूबाजूला रहाणारे आणि ओळखीचे यांना सत्संगासाठी एकत्र जमवणे, सत्संगाची सिद्धता करणे, सात्त्विक उत्पादनाचे वितरण करणे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, जिल्ह्यात पूर्णवेळ झालेल्या साधकांच्या जेवणाचे डबे बनवून त्यांना नेऊन देणे, अर्पण देणे इत्यादी सेवा केल्या.

२ इ २. कुटुंबियांनाही सेवेत सहभागी करवून घेणे, आजोबांच्या निधनानंतर सोलापूरहून पुण्याला रहायला आल्यावरही साधना चालू ठेवणे : तिने आजोबा आणि मोठी आजी यांनाही सेवेत सहभागी करून घेतलेे. माझे आजोबा आणि मोठी आजी यांनी चांगली साधना अन् सेवा केली. त्यामुळे ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले. आजोबा आणि मोठ्या आजीचे देहावसन झाल्यानंतर सुशाई (आजी) सोलापूर सोडून पुणे येथे मुलींकडे रहायला आली. तेथेही तिने अर्पण देणे, सत्संग ऐकणे आणि सतत नामजप करणे, अशी साधना चालू ठेवली.

२ ई. हृदयविकाराचा तीव्र झटका

२ ई १. आजीला हृदयविकाराचा तीव्र झटका येणे आणि गुरुदेवांवरील श्रद्धेमुळे सर्वकाही सहन करू शकणे : २३.२.२०२१ या दिवशी तिच्या छातीत असह्य वेदना होत होत्या. त्यासाठी ती अत्तर आणि कापराचे उपाय करत बसली होती. तिने घरच्यांना ‘छातीत दुखत आहे’, एवढेच सांगितले. तिला हृदयविकाराचा झटका आल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही. तिला चिकित्सालयात नेल्यावर आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तिला हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे आणि तिची स्थिती अतिशय गंभीर असल्याने तिला अतिदक्षता (आय्.सी.यू.) विभागात ठेवावे लागेल.’’ साधनेमुळे निर्माण झालेले बळ आणि गुरुदेवांवरील श्रद्धा यांमुळे ती सर्वकाही सहन करू शकली. ‘त्या स्थितीत केवळ गुरुदेवच मला सांभाळत आहेत’, असे ती म्हणत होती.

२ ई २. विविध व्याधी असल्याचे लक्षात आल्यावर आधुनिक वैद्यांनी हृदयाचे शस्त्रकर्म न करणे : आजीला रुग्णालयामध्ये अतीदक्षता विभागात ठेवले. नंतर तिच्या रक्ताच्या चाचण्या केल्या. तेव्हा तिला विविध व्याधी झाल्याचे लक्षात आले. तिच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले आणि रक्तदाबही न्यून झाला. ‘तिच्या हृदयात मोठे अडथळे (ब्लॉकेजेस) असून ते त्वरित काढावे लागतील’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले. अहवालात तिच्या मूत्रपिंडाला सूज आल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तिची ‘अ‍ॅन्जोग्राफी’ आणि शस्त्रकर्म करण्याचे रहित केले.’

३. श्रीमती सुशिला साळुंके रुग्णाईत झाल्यानंतर त्यांच्यात त्यांच्या मुलींना जाणवलेले पालट  !

३ अ. बोलणे न्यून होणे : ‘सुशाईचा स्वभाव बोलका असल्याने ती अखंड बोलत असायची; पण गेल्या ६ मासांपासून तिचे बोलणे अल्प होऊन नामजप करण्याचे प्रमाण वाढले होते. कुणी तिच्याशी बोलले, तरच ती बोलायची; अन्यथा सतत नामजप करायची. रात्रीही पाहिले, तर ती एकटीच उठून नामजप करत बसलेली दिसायची. ती हात जोडून सतत गुरुदेवांना प्रार्थना करायची आणि अत्तर अन् कापूर यांचे उपाय करतांना दिसायची. तिचे बोलणेही शांत आणि एका लयीत झाले होते.

३ आ. शांत होणे : तिचा स्वभाव मुळात रागीट होता; पण आता ती पुष्कळ शांत झाली होती. आता ती केवळ स्मितहास्य करायची. तिच्याकडे पाहून ‘ती सतत परात्पर गुरु डॉक्टरांच्या अनुसंधानात आहे’, असे वाटायचे.

३ इ. आवडीनिवडी न रहाणे : पूर्वी तिला खाण्याच्या पुष्कळ आवडी निवडी होत्या. तिला चमचमीत, तिखट आणि तेलकट पदार्थ आवडायचे; पण आता मात्र तिच्या आवडी-निवडी संपल्या होत्या. आम्ही जे देऊ, ते आणि तेवढेच ती खायची. ती स्वतःहून काहीच मागायची नाही. तिचे जेवणही फार अल्प झाले होते.

३ ई. इतरांचा विचार

१. प्रथम थकव्यामुळे तिला शरीरधर्मासाठी हात धरून घेऊन जावे लागायचे. अलीकडे ती सर्वकाही स्वतःचे स्वतः करायची. ‘तिच्यामुळे इतरांना त्रास होणार नाही’, याची ती काळजी घ्यायची.

२. तिच्या या अवस्थेतही ती नकातेकाकांच्या प्रकृतीची भ्रमणभाषवर विचारपूस करायची. ते दोघेही एकमेकांकडे पाहून हात जोडून नमस्कार करायचे आणि ‘प.पू. भक्तराज महाराजांकडे आपल्याला जायचे आहे’, असे एकमेकांना सांगायचे. त्या वेळी ‘हे दोन्ही जीव प.पू. भक्तराजांच्या भक्तीच्या दोरीत घट्ट बांधले असून त्यांना आता त्यांच्यामध्येच विलीन व्हायचे आहे’, असे वाटायचे.

३ उ. प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी भाव असणे : प.पू. बाबांची भजने लावली की, तिच्या तोंडवळ्यावर फार आनंद जाणवायचा आणि ती डोलू लागायची. तिचे भजनांवर फार प्रेम होते. जेवतांनाही तिचा ‘प.पू. बाबांच्या भंडार्‍यातीलच प्रसाद आहे’, असा भाव असायचा.

३ इ. निरागसता येणे : अलीकडे तिचा तोंडवळा लहान बालकाप्रमाणे निरागस आणि तेजस्वी दिसू लागला होता.

३ ई. आलेल्या अनुभूती

१. तिच्या सहवासात मन स्थिर आणि शांत होऊन आपोआप नामजप व्हायचा.

२. तिच्या अवतीभोवती सतत हलकेपणा जाणवायचा. त्यामुळे ‘तिच्या जवळ बसून रहावे’, असे वाटायचे.

‘गुरुदेवा, सुशाईमध्ये आलेली निरागसता, सतत देवाच्या अनुसंधानात रहाण्याची ओढ आणि झालेले पालट पाहून केवळ अन् केवळ तुमच्या प्रती शरणागतीने कृतज्ञता वाटते. देवा, तुम्ही अशीच ओढ आणि तळमळ आम्हा सर्वांमध्ये निर्माण करा आणि आम्हाला आपल्या चरणांशी घ्या’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’

– सौ. मीना महादेव नकाते (मोठी मुलगी), सोलापूर, सौ. छाया विक्रम निकम (मधली मुलगी) पुणे, सौ. आशा प्रकाश निकम (लहान मुलगी), पुणे आणि सौ. प्रार्थना बुवा (नात), पुणे

४. सौ. अर्चना मनोज नकाते (आजींची नातसून), सोलापूर

४ अ. आजीने वर्तमानकाळात रहाणे आणि तोंडवळ्यावर तेज जाणवणे : ‘मागील ६ मासांच्या कालावधीत आजींच्या तोंडवळ्यावर तेज आले होते. ‘या कालावधीत त्या वर्तमानकाळात रहात आहेत’, असे लक्षात आले.’

५. प्रार्थना

‘गुरुमाऊली, तुम्ही सर्व सुख-दुःख जाणणारे जगताचे स्वामी आहात. आम्ही सर्व जण तुमच्या चरणांशी आलो आहोत. ‘तुम्हीच आमच्या अखेरच्या श्‍वासापर्यंत आम्हाला बांधून ठेवणार आहात’, हे आम्हाला ठाऊक आहे. ‘तुम्हीच आमच्या मनी अपार श्रद्धा जागृत ठेवा’, हीच आपल्या चरणी प्रार्थना ! देवा, आता तुमचे स्मरण आणि चरण यांविना काहीच नको. ‘भगवंता, आम्हाला आपल्या जवळ घ्या’, हीच आम्हा सर्व लेकरांची तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’ – सौ. प्रार्थना दत्ता बुवा, पुणे

(समाप्त)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक