रुग्णाईत असतांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या सतत अनुसंधानात राहून शांत आणि स्थिर झालेल्या अन् ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या पुणे येथील कै. श्रीमती सुशिला नागनाथ साळुंखे !

‘माझी आई श्रीमती सुशिला नागनाथ साळुंखे (वय ९२ वर्षे) हिला आम्ही सर्वजण ‘सुशाई’ म्हणायचो. तिच्यावर सर्व जण पुष्कळ प्रेम करायचे. ती प्रत्येकाच्या समवेत त्याच्या वयानुसार हसत-खेळत वागायची. २७.४.२०२१ या दिवशी तिचा निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने ती रुग्णाईत असतांना आम्हा कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्रीमती सुशिला नागनाथ साळुंखे

१. सौ. मीना नकाते (मोठी मुलगी), सोलापूर

१ अ. आई रुग्णाईत असतांना तिला प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन ऐकू येणे आणि त्यांच्या भजनात ती आनंदाने एकरूप होणे : ‘मी आईला पुण्याला रुग्णालयात भेटायला गेले होते. तिला भेटण्यासाठी कुणीही तिच्या जवळ गेल्यावर ती त्यांना विचारायची, ‘‘प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) भजन म्हणत आहेत. तुम्हाला ते ऐकू येते ना ?’’ मी तिच्याजवळ गेल्यावर तिने मलाही हे विचारले. तेव्हा मलाही तेथे प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवले. बर्‍याचदा आईला नामजपही ऐकू यायचा. त्या वेळी ‘नामजप आणि भजन यांत ती आनंदाने एकरूप होऊन जात आहे’, असे मला वाटले.

१ आ. आई रुग्णालयात भेटायला येणार्‍यांशी आनंदाने बोलणे आणि तिला परात्पर गुरु डॉक्टर सतत जवळ असल्याचे जाणवणे : तिला भेटायला गेलेल्यांशी ती आनंदाने बोलायची. तिच्याकडे पाहून आम्हाला ‘तिला काही झालेच नाही’, असे वाटायचे. ती भेटायला येणार्‍या प्रत्येकाची विचारपूस करत होती. ‘मी छान आहे. माझ्या समवेत माझे प.पू. बाबा आहेत आणि परात्पर गुरु डॉक्टर सतत माझ्या जवळच आहेत’, असे ती सांगायची. तिची स्थिती स्थिर आणि शांत होती. तिची गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा पाहून आमचा कृतज्ञताभाव जागृत होत होता.

१ इ. आईच्या तोंडवळ्यावर सदैव असलेले हास्य पाहून आधुनिक वैद्यांना पुष्कळ आश्‍चर्य वाटणे आणि तिची ‘परात्पर गुरु डॉक्टर सर्व काळजी घेत आहेत’, अशी श्रद्धा असणे : आईला एवढे त्रास होत असूनही तिच्या तोंडवळ्यावर मात्र हास्यच असायचे. हे पाहून रुग्णालयातील आधुनिक वैद्यही आश्‍चर्यचकित व्हायचे. ते म्हणाले, ‘‘आजींकडे पाहून त्या ९२ वर्षांच्या आहेत’, असे वाटतच नाही. त्या ६५ – ७० वर्षांच्या वाटतात. आजी एकदम बळकट (स्ट्राँग) आहेत. त्यांना आलेला हृदयविकाराचा झटका पुष्कळ तीव्र होता. तो त्यांनी कसा सहन केला ? त्यांनी ते घरात कुणाला जाणवूही दिले नाही. त्यांच्या तोंडवळ्यावर सदैव हास्य दिसते. त्या त्यांच्या वेदना कशा लपवतात ?’’ त्या वेळी ती प्रत्येकाला म्हणायची, ‘‘माझी काळजी माझे गुरुदेव, म्हणजे माझे परात्पर गुरु डॉक्टर घेतात. ते मला काहीच जाणवू देत नाहीत. ते मला फुलासारखे सांभाळतात. माझ्याकडून अजून साधना करून घ्यायची असेल, तर ते मला ठेवतील; अन्यथा माझा प्रवास पुढच्या दिशेने नेतील.’’

१ ई. सुशाईचे वय पाहून तिला घरी नेण्याचा निर्णय होणे आणि घरी आणल्यावर ती सर्वांशी हसून-खेळत बोलत असणे : तिचे आलेले सर्व अहवाल (रिपोर्ट) पहाता आणि तिच्या ९२ वर्षे वयाचा विचार करता तिला या वयात कुठलेही शस्त्रकर्म सहन होणार नाही; म्हणून माझ्या भावाने आईला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही २६ फेब्रुवारीला आईला घरी घेऊन आलो. त्या वेळी डॉक्टरांनी तिच्या किडनीची सूज आणि रक्तदाब यांसाठी औषधे दिली. हृदयविकारावर काहीच औषध दिले नाही; कारण त्यावरील ‘ब्लॉकेजेस’ काढणे’, हाच उपाय असल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले. घरी आणल्यानंतर सुशाई आम्हा सर्वांमध्ये हसून खेळून बोलू लागली. जणूकाही तिला काही झालेच नव्हते.

१ उ. हृदयविकाराचा दुसरा झटका येऊन सुशाई अत्यवस्थ होणे, त्या वेळी तिच्यासाठी नामजपादी उपाय करत असतांना सुशाई स्वतः परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आळवत असणे, काही वेळाने स्थितीत सुधारणा होऊन ती सकाळी ६ वाजता शांत झोपणे : आईला घरी आणल्यावर तिला पुन्हा हृदयविकाराचा दुसरा झटका आला. त्या वेळी तिला छातीत तीव्र वेदनादायी कळ आली. तिने देवाला मोठ्याने हाक मारली आणि पूर्णपणे मानच टाकून दिली. त्या वेळी तिची जीभ बाहेर पडली आणि डोळे पांढरे झाले. ‘देहातून जीव निघून गेल्यावर व्हावे’, तशी ती पूर्णपणे गळून गेली; पण त्या वेळी गुरुमाऊलीने मला सामर्थ्य दिले आणि मी सर्वांना स्थिर अन् शांत राहून प.पू. भक्तराज महाराजांचा जयघोष करायला सांगितले. मी आईला म्हणाले, ‘‘प.पू. भक्तराज महाराजांना आळव. या शेवटच्या क्षणी देवाचेच ध्यान कर.’’ त्या वेळी ‘प.पू. बाबांची भजने लावणे, नामजप लावणे’, असे सर्व गुरुदेवांनी करवून घेतले. तिला अत्तर-कापूर लावले. त्या दिवशी सामूहिक नामजप असल्यामुळे आम्ही पहाटे साडेपाचला नामजप चालू केला. त्यानंतर तिची स्थिती पूर्ववत् होऊन सकाळी ६ वाजता ती शांत झोपली. तेव्हा देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. तिच्या त्याही अवस्थेत आई प.पू. भक्तराज महाराजांना हाक मारत होती आणि ‘प.पू. डॉक्टर, माझ्याकडून साधना करवून घ्या’, असे त्यांना आळवत होती. तेव्हा ‘त्रासापेक्षा तिचे लक्ष देवाकडेच अधिक होते’, असे वाटून मला देवाप्रती फार कृतज्ञता वाटत होती.’

२. सौ. प्रार्थना बुवा (नात), पुणे

२ अ. लहानपणापासून नातवंडांचा सांभाळ करून त्यांच्यावर चांगले संस्कार करणे : ‘मी आणि माझा भाऊ लहानपणापासून आजी-आजोबांकडेच राहिलो. त्यांनीच आम्हाला लहानाचे मोठे केले. त्यामुळे आमचा ओढा सदैव आजी-आजोबा यांच्याकडेच आहे. ‘श्री गुरु आपल्या जीवनात येऊन आपल्यावर कृपा करतात आणि आपल्यात पालट घडवून आपल्याला देवाच्या चरणांपर्यंत पोचवतात’, हे आपण अनेक ग्रंथातून वाचले किंवा ऐकले आहे. हे मी इथे अनुभवत होते. त्यांच्यासारखेच काहीसे कार्य माझे वडील श्री. महादेव नकातेकाका आणि माझ्या आजीने केले आहे.

२ आ. आजीचा जीवनपट

२ आ १. आजीचा विवाह झाल्यावर काही काळानंतर आजोबा रुग्णाईत होणे, त्यामुळे घरचे सर्व दायित्व आजीवर येणे : माझी आजी ही माझ्या आजोबांची दुसरी बायको आहे. माझ्या पहिल्या आजीला मूल होत नसल्यामुळे घरच्यांनी आजोबांचा आजीशी विवाह करून दिला. विवाहानंतर आजीला ३ मुली आणि १ मुलगा झाला. काही काळानंतर आजोबांना क्षयरोग झाल्याने आणि मोठी आजीही अशिक्षित असल्याने घरचे सर्व दायित्व माझ्या आजीवर आले. तिने श्री खंडोबावर श्रद्धा ठेवून ते पार पाडले. तिने तिचा सर्व भार खंडेरायांच्या चरणी सोपवला होता आणि त्यांच्या कृपेच्या बळावर ती सर्वकाही करत होती.

२ आ २. आरोग्य विभागात नोकरी करून तुटपुंज्या पगारात कष्टात दिवस काढणे : विवाहानंतर आजीला लगेच आरोग्य विभागात नोकरी लागली. आजोबांना झालेल्या क्षयामुळे ‘आजोबा आज जातील कि उद्या ?’, अशी स्थिती निर्माण झाली होती. अशा या काळात आजीच्या तुटपुंज्या पगारात घरखर्च, घरभाडे, मुलांचे संगोपन आणि इतर सर्व काही भागणे अशक्य होते. त्यात मुली मोठ्या झाल्या असल्याने त्यांच्या विवाहाचे दायित्वही होते. आमच्या नातेवाइकांकडून प्रेम, आधार किंवा अन्य कसलेही साहाय्य मिळाले नाही, तरीही आजीने जीव पणाला लावून आणि फार कष्ट करून दिवस काढले.

२ आ ३. आर्थिक स्थिती हालाखीची असतांना देवावर श्रद्धा ठेवून घरातील कर्तव्य पार पाडणे : आजोबांचे दुखणे दिवसेंदिवस वाढतच चालले होते. त्यामुळे त्यांचे औषधोपचार आणि घरखर्च यांचा मेळ बसवण्यासाठी आजीने आरंभी स्वतःचे सर्व दागिने विकले. एवढे होऊनही परिस्थिती इतकी हालाखीची झाली की, स्वयंपाक करून मुलांना खाऊ घालणेही अशक्य झाले होते. त्यामुळे आजीला घरातील वस्तूही विकाव्या लागल्या, तरीही तिने इतरांकडून अपेक्षा न करता श्री खंडोबावर श्रद्धा ठेवून घरातील सर्व कर्तव्ये पार पाडली.

२ आ ४. आजीचे माहेर ऐश्‍वर्यसंपन्न असणे; पण विवाहानंतर तिच्या पदरी कष्ट आणि दारिद्य्र येणे : आजीने सेवानिवृत्त होईपर्यंत सरकारी आरोग्य विभागात नोकरी केली. आजीचे माहेर, म्हणजे साक्षात् सोन्याची लंकाच होती. त्या ऐश्‍वर्यात वाढलेल्या आजीच्या नशिबी विवाहानंतर अठरा विश्‍वे दारिद्य्र, कष्ट, त्रास आणि  हालाखीचे जीवन आले. या परिस्थितीशी आजीने एक ढाल होऊन लढत लढत संसाराचा गाडा खंबीरपणे ओढला.

आयुष्यात तिने फार कष्ट सोसले, तरी तिने कधीच स्वतःच्या कष्टाचे किंवा त्रासाचे कुणाला वर्णन करून दिले नाही. उलट ‘आज मी किती सुखी आणि समाधानी आहे ?’ अन् देवाने मला किती आनंदी ठेवले  आहे ?’, हेच प्रत्येकाला सांगायची.

२ आ ५. सर्वांना साहाय्य केल्याने आजी सर्वांना हवीहवीशी वाटणे : आजीने ४० वर्षे निवृत्त होईपर्यंत अतिशय कष्टाने आरोग्य विभागात नोकरी केली. तिने आयुष्यभर समाजकार्यही केले. सतत ‘इतरांना साहाय्य करणे, इतरांसाठीच जगणे आणि इतरांच्या आनंदात आनंद मानणे’, हाच तिचा स्वभाव आहे. आयुष्यात ती केवळ इतरांसाठीच जगली. कामाच्या ठिकाणचे लोक, नातेवाईक किंवा आजूबाजूचे लोक यांच्या अडचणीच्या वेळी ती साहाय्यासाठी धावून जायची. त्यामुळे ती सर्वांना हवीहवीशी वाटायची. सुशाईमध्ये प्रामाणिकपणा असल्याने तिने कधीच कुणाला लुबाडले नाही की, ‘कुणाचे काही घ्यावे’, असे तिला कधी वाटले नाही किंवा कुठल्याही गोष्टीचा तिला हव्यास नव्हता. त्यामुळे तिने आयुष्यभर निष्काम कर्म केले.’


 भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/472403.html