६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत सहस्रबुद्धे यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे

‘१४.६.२०२० या दिवशी श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली. श्री. यशवंत अनंत सहस्रबुद्धे यांचे संपूर्ण कुटुंब (पत्नी, मुलगी, मुलगा आणि स्नुषा) सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. त्यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. यशवंत सहस्रबुद्धे

१. सौ. प्रतिभा यशवंत सहस्रबुद्धे (श्री. यशवंत सहस्रबुद्धे यांची पत्नी)

१ अ. ‘यजमानांची आध्यात्मिक पातळी घोषित व्हावी’, ही इच्छा गुरुकृपेने पूर्ण होणे : ‘यजमानांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे समजल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. ‘यजमानांची पातळी घोषित व्हावी’, अशी माझी पुष्कळ दिवसांपासूनची इच्छा होती. परात्पर गुरुमाऊलींच्या कृपेने आज ती इच्छा पूर्ण झाली.

१ आ. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता सेवेसाठी जाणे आणि शारीरिक त्रासातही प्रवासाविषयी कधीही कंटाळा न करणे : त्यांनी ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता सतत प्रवास केला. काही दिवसांसाठी घरी आले, तरी त्यांना ‘कधी एकदा सेवेसाठी जातो’, असे होत असे. ते दोन्ही खांद्यांवर २ बॅगा घेऊन घरातून बसस्थानकापर्यंत चालत जायचे. त्यांचे हात आणि मान सतत दुखत असत, तरीही त्यांनी प्रवासाविषयी कधीही कंटाळा केला नाही. यातून त्यांची ‘सेवेविषयीची तळमळ, सातत्य आणि चिकाटी’, हे गुण दिसून येतात.

१ इ. सतत इतरांना साहाय्य करण्याचा विचार त्यांच्या मनात चालू असतो.

१ ई. शिक्षण अल्प असले, तरी सेवेविषयीच्या तीव्र तळमळीमुळे संगणक शिकणे : त्यांचे शिक्षण अल्प असले, तरी सेवेच्या तीव्र तळमळीमुळे त्यांनी संगणक शिकून घेतला आणि आता ते संगणकीय सेवा करू शकतात.

​‘परात्पर गुरुदेव, सद्गुरु नंदकुमार जाधवकाका आणि अन्य साधक यांनी साहाय्य केल्यामुळे आम्ही हा आनंदाचा दिवस अनुभवू शकलो’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

कु. मेधा सहस्रबुद्धे

२. कु. मेधा यशवंत सहस्रबुद्धे  (श्री. यशवंत सहस्रबुद्धे यांची मुलगी)

२ अ. वडिलांच्या प्रेमळ स्वभावामुळे ते कधी चिडल्याचे किंवा रागावल्याचे आठवत नसणे, लहानपणापासून त्यांची कधीच भीती न वाटणे आणि घरातील वातावरण नेहमी आनंदी अन् चांगले असणे : ‘ते स्वभावाने अतिशय प्रेमळ आहेत. ‘ते आमच्यावर चिडले किंवा आमच्याशी रागावून बोलले’, असे कधी झाले नाही. ‘लहानपणापासूनच आम्ही दोघांनी (मी आणि श्री. महेंद्र सहस्रबुद्धे (दादा)) कितीही त्रास दिला, तरी ते रागावले किंवा आम्हाला मारले’, असे मला आठवत नाही. घरातील वातावरण नेहमी आनंदी आणि चांगले असे. त्यांनी दादाचे लग्न झाल्यावरही सौ. मानसीला (सुनेला) आपली मुलगीच समजून वागणूक दिली.

२ आ. नीटनीटकेपणा असणे : ‘प्रत्येक वस्तू नीटनेटकी आणि व्यवस्थित ठेवणे’ हा त्यांचा आणखी एक गुण आहे. प्रवासाला निघतांना स्वतःची बॅग भरतांना ते सर्व साहित्य नीट भरतात. त्या साहित्यामध्ये उपायांचे संचही करून ठेवतात. त्यांना अंथरूणही नीटच घातलेले आवडते. गादीवर घातलेल्या चादरीला एकही सुरकुती राहिलेली त्यांना चालत नाही. लहानपणी मी त्यांचे अंथरूण घालत असे. तेव्हा ते मला ‘चादर नीट घाल, सर्व सुरकुत्या नीट कर’, असे सांगत.

२ इ. आवड-निवड नसणे : त्यांना कसलीही आवड-निवड नाही. ‘जेवणात अमुक एक पाहिजे’, असा त्यांचा कधीही आग्रह नसतो. त्यामुळे ‘आईलाही स्वयंपाकात पुष्कळ वेगळे काही करावे लागले’, असे कधी झाले नाही.

२ ई. सतत इतरांना साहाय्य करणे : बाबा सर्व नातेवाइकांना साहाय्य करत असत. ते त्यांच्या भावंडांमधे सर्वांत लहान असूनही तेच मोठ्या भावाला साहाय्य करत असत. आमची शेती असतांना ते नोकरीच्या गावाहून प्रत्येक सप्ताहाला गावाला जाऊन मोठ्या भावाला शेतीच्या कामात साहाय्य करत असत. तेवढ्याच दायित्वाने आजारी आई-वडिलांचीही काळजीही ते घेत असत. इतरांना सर्व प्रकारचे साहाय्य करायला ते नेहमी सिद्ध असतात. एखाद्या साधकाला काही अडचण असेल, तर ते त्याला लगेचच त्याची अडचण सुटेपर्यंत साहाय्य करतात.

२ उ. कोणत्याही गोष्टीसाठी आग्रह न धरता कुटुंबाला साधना करण्यासाठी साहाय्य करणे : त्यांनी आमच्यावर लहानपणापासून कोणतीही गोष्ट लादली नाही किंवा आमच्याकडून कसल्याही अपेक्षा ठेवल्या नाहीत. लहानपणापासून आई-बाबा दोघांनीही आमच्यावर चांगले संस्कार केले. ‘संपूर्ण कुटुंबाला साधना सांगून त्यांनी वडील म्हणून असलेले कर्तव्य देवाला अपेक्षित असे पूर्ण केले आहे’, असे मला वाटते. त्यांनी आमच्याकडून व्यावहारिक अपेक्षा कधीही व्यक्त केली नाही. ते दादाला (श्री. महेंद्र सहस्रबुद्धे यांना) म्हणाले, ‘‘तू साधनाच कर. मला जेवढे शक्य आहे, तेवढे मी तुला साहाय्य करीन.’’ बाबांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच आम्ही पूर्णवेळ साधना करू शकत आहोत.

२ ऊ. उत्तम नियोजनकौशल्य असणे : ते आर्थिक व्यवहाराचे नियोजन पूर्वीपासूनच उत्तम करतात. या नियोजनाचे महत्त्व मला साधनेत आल्यावर समजले. प्रतिवर्षी मार्च आणि एप्रिल मासामध्येच घराची घरपट्टी, तसेच अन्य मोठा खर्च असे; पण त्यासाठीही त्यांचे आर्थिक नियोजन एक वर्ष आधीपासूनच असे. ‘अकस्मात् अडचण येऊ नये’, असा त्या मागे त्यांचा उद्देश असे. देवाच्या कृपेमुळे अल्प पैशातही घरातील सर्व व्यवहार पूर्ण होत असत.

२ ए. आज्ञापालन करणे : साधनेत आल्यावरही सत्संगात जे जे सांगितले जात होते, ते लगेचच आचरणात आणत असत. त्याचे एक उदाहरण म्हणजे आरंभीला ‘सत्संगात देवघरात पुष्कळ देव नकोत, आवश्यक तेवढेच देव पाहिजे’, असे सांगितल्यावर मनात कोणतीही शंका न आणता त्यांनी लगेचच देवघरात आवश्यक तेवढेच देव ठेवले आणि अधिकचे देव, देवतांची चित्रे लगेचच जवळच्या गणपतीच्या देवळात नेऊन ठेवली. ‘आपल्याला शास्त्र समजले आहे, तर लगेचच कृती केली पाहिजे’, असे त्यांना वाटले.

२ ऐ. संत आणि देवी-देवता यांवर अपार श्रद्धा असणे : प.पू. भक्तराज महाराज यांचा कांदळी येथे आश्रम आहे. तेथून आमचे गाव तीन किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी बाबांना शेतीच्या कामासाठी बर्‍याचदा कांदळी येथे जावे लागत होते; पण तेव्हा त्यांना प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन आणि त्यांचे कार्य यांविषयी ठाऊकही नव्हते. वर्ष १९९६ मध्ये माझ्या मावशीने दादाला बारावीच्या अभ्यासासाठी एक पुस्तक दिले होते. या पुस्तकात प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आम्हाला मिळाले. ते छायाचित्र बाबांनी देवघरात ठेवले आणि प्रतिदिन त्याची पूजा चालू केली. मी त्यांना म्हणाले, ‘‘हे कोणते संत आहेत आणि तुम्ही त्यांची पूजा का करता ?’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘संत कोणतेही असो, त्यांची पूजा केली पाहिजे.’’ देवाचे नियोजन आपल्याला समजत नाही, हेच खरे.

२ ओ. ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयीचे प्रवचन ऐकल्यानंतर साधनेला आरंभ करणे आणि ‘प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र घरात का आले असावे ?’, याचाही उलगडा होणे : ऑक्टोबर १९९७ मध्ये ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’च्या माध्यमातून घेतलेले ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, याविषयीचे प्रवचन बाबांनी ऐकले आणि साधनेला आरंभ केला. त्या वेळी त्यांना प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयीही समजले. तेव्हा ‘घरी वर्ष १९९६ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र का आले ?’, याचा आम्हाला उलगडा झाला.

​‘भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला साधना करणार्‍या कुटुंबात जन्म लाभला. साधनेला प्रोत्साहन देणारे वडील लाभले’, याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला शब्दच नाहीत. ‘परम पूज्य, ‘याच जन्मी आमच्या कुटुंबाला तुमच्या चरणांशी घ्या. तुमची कृपादृष्टी आमच्यावर अखंड असू देत’, अशी प्रार्थना आहे.’

श्री. महेंद्र सहस्रबुद्धे

३. श्री. महेंद्र यशवंत सहस्रबुद्धे (श्री. यशवंत सहस्रबुद्धे यांचा मुलगा)

३ अ. शासकीय कार्यालयात वाहन-चालक असल्याने अल्प वेतनातही घरात कधी काही न्यून पडू न देणे आणि एखाद्या वस्तूविषयी पुन्हा सांगावे लागत नसणे, ती तत्परतेने ते आणून देत असणे : ‘बाबा शासकीय कार्यालयात वाहन-चालक म्हणून नोकरी करत होते. त्या वेळी त्यांना वेतन अल्प होते, तरीही लहानपणापासून त्यांनी आम्हाला कधी काही न्यून पडू दिले नाही. ‘आम्हाला एखादी वस्तू हवी आहे’, असे त्यांना समजले की, ते तत्परतेने आणून देत असत. वस्तू आणतांनाही ती चांगल्या गुणवत्तेची, अधिक दिवस टिकेल, अशीच ते आणत असत.

३ आ. ‘दम्याच्या त्रासासाठी काही औषध मिळत आहे’, असे समजल्यावर ते तत्परतेने आणणे : मला लहानपणापासून दम्याचा त्रास आहे. बाबांचे शासकीय चाकरी निमित्ताने बर्‍याच ठिकाणी फिरणे होत असे. ‘दम्याच्या त्रासासाठी काही औषध मिळत आहे’, असे त्यांना समजल्यावर ते तत्परतेने माझ्यासाठी आणत असत. ‘मी दम्याच्या त्रासासाठी सर्व प्रकारची औषधे घेऊन पाहिली आहेत. माझा दम्याचा त्रास ‘होमिओपॅथी’ औषधाने न्यून झाला आहे, तरीही त्यांना दम्याचा त्रास न्यून होण्यासाठी काही नवीन समजले, तर ते आवर्जून मला सांगतात.

३ इ. महाविद्यालयीन शिक्षणासमवेत संगणकीय प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणे : साधनेत येण्यापूर्वी मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच संगणकीय प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी मला प्रोत्साहन दिले. त्या वेळी संगणकीय प्रशिक्षण घेण्यासाठी अधिक शुल्क लागत असे, तसेच ते शिक्षण राजगुरुनगर येथे उपलब्ध नसल्यामुळे पुणे येथे प्रतिदिन येऊन-जाऊन करावे लागत होते. यासाठी अधिकचा खर्च होत असे, तरी त्यांनी सलग ३ वर्षे उत्तम नियोजन केले.

३ ई. दैनिक ‘सनातन प्रभात’साठी पूर्णवेळ साधना करण्याची अनुमती देणे :
मला साधनेत पूर्णवेळ होण्याचा निर्णय घेण्यासाठी त्यांनी दिलेला पाठिंबा पुष्कळ मोलाचा आहे. महाविद्यालयीन शिक्षण आणि संगणकीय प्रशिक्षण यांवर बराच व्यय झाला होता. महाविद्यालयीन शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा झाल्यानंतर त्यांनी मला पूर्णवेळ साधना करण्यासाठी जाण्यास सांगितले. त्या वेळी माझे संगणकीय शिक्षणातील शेवटचे सहा मास शिल्लक होते आणि संपूर्ण प्रशिक्षणाचे शुल्क भरून झाले होते.
​संगणकीय शिक्षण झालेले असल्यामुळे मला दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयीन सेवेत संगणकीय सेवा करण्याविषयी विचारल्यानंतर त्यांनी तात्काळ मला साधना करण्याची अनुमती दिली. माझ्या संगणकीय प्रशिक्षणासाठी पुष्कळ व्यय झाला होता. सहा मासांनंतर मला संगणकीय शिक्षणातील पदवी मिळू शकते, पदवीनंतर चांगल्या प्रकारे नोकरीही मिळू शकते, असे असतांनाही त्यांनी मला दैनिक ‘सनातन प्रभात’साठी पूर्णवेळ सेवा करण्याची अनुमती दिली.

मी पूर्णवेळ साधना करायला लागल्यानंतर ४ – ५ वर्षांनी त्यांनीही सेवानिवृत्ती स्वीकारून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. सर्व कुटुंब साधनेत २० वर्षे पूर्णवेळ सेवा करत असतांनाही त्यांनी कशाचीच न्यूनता आम्हाला भासू दिली नाही.’

(क्रमशः वाचा उद्याच्या अंकात)